४६ लाभार्थ्यांना सदनिकांचे वाटप; उर्वरित लाभार्थ्यांसाठी ३० सप्टेंबरला सोडत
देवगड,दि.२२ सप्टेंबर
देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या प्रधानमंत्री आवास योजना (AHP) अंतर्गत परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पातील सदनिकांची सोडत मंगळवारी पारदर्शक पद्धतीने पार पडली. जामसंडे येथील सांस्कृतिक केंद्रात या सोडतीचे आयोजन करण्यात आले होते.
या सोडतीस नगराध्यक्ष साक्षी प्रभु ,उपनगराध्यक्ष मिताली सावंत, बांधकाम सभापती रोहन खेडेकर, गटनेते शरद तुकरूल, मुख्याधिकारी हरिदत्त माने यांच्यासह नगरपंचायत कर्मचारी आणि संबंधित प्रकल्पाचे विकासक उपस्थित होते.
प्रकल्पातील एकूण ६३ लाभार्थ्यांच्या सदनिकांसाठी सोडत प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी ४६ लाभार्थी प्रत्यक्ष उपस्थित होते. उपस्थित लाभार्थ्यांसाठी सोडत काढून त्यांना सदनिकांचे वाटप करण्यात आले.
उर्वरित लाभार्थ्यांसाठी सदनिकांच्या वाटपाची सोडत ३० सप्टेंबर २०२६ रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती नगरपंचायतीकडून देण्यात आली.
दरम्यान, संबंधित प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून घरांचा ताबा देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी हरिदत्त माने यांनी सांगितले. पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या सदनिकांचा ताबा नियमानुसार मिळावा, यासाठी नगरपंचायत प्रशासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सोडत प्रक्रियेदरम्यान नगरपंचायत प्रशासन, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पारदर्शकता राखल्याने लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.