नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती; तिन्ही तालुक्यांत स्वतंत्र मेळावे घेण्याच्या सूचना
देवगड, दि.१४ जून
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कणकवली विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक देवगड किल्ला गणेश मंदिर सभागृहात पार पडली. राज्य सरचिटणीस शिरीष सावंत आणि जिल्हा संपर्क अध्यक्ष संदीप दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत संघटन वाढ आणि संघटना अधिक सक्षम करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी मनसेचे राज्य सरचिटणीस शिरीष सावंत यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना पक्षवाढीसाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबी उपलब्ध करून देत कार्यकर्त्यांना बळ दिले जाईल, असे सांगितले. आगामी नगरपंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने योग्य नियोजन करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच कणकवली विधानसभा मतदारसंघातील तिन्ही तालुक्यांमध्ये स्वतंत्र मेळावे लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीला जिल्हाध्यक्ष धीरज परब, उपजिल्हाध्यक्ष चंदन मेस्त्री, गणेश वाईरकर, कुणाल किनळेकर, कणकवली तालुकाध्यक्ष शांताराम सादये, देवगड तालुका सचिव जगदीश जाधव, शहराध्यक्ष सचिन राणे, महिला तालुका उपाध्यक्ष स्वाती सावंत, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष पप्पू जाधव, शहराध्यक्ष अभिजित तेली यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.