पौष्टिक आहार, पर्यावरण संवर्धन आणि व्यवहारज्ञानाचा अनोखा संगम
देवगड ,दि.१८ जुलै
भाजी घ्या भाजी… ताजी ताजी रानभाजी… फोडशी, कुर्डू, अळू, शेवग्याचा पाला, पेवा, भारंगी, टाकळा, सुरण, कुड्याच्या शेंगा, फागली…” अशा उत्साहपूर्ण आरोळ्यांनी शनिवारी सकाळी खुडी नं. १ शाळेचे परिसर अक्षरशः दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांनी भरविलेल्या रानभाजी महोत्सवाला ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने प्रतिसाद देत विविध रानभाज्यांची खरेदी केली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही १८ जुलै रोजी खुडी नं. १ शाळेच्या वतीने रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी परिसरात सहज उपलब्ध होणाऱ्या विविध रानभाज्या, पालेभाज्या आणि गावठी भाज्यांचे आकर्षक स्टॉल उभारून विक्री केली. स्वतःच्या दुकानातून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मुलांनी केलेली धडपड आणि विक्रीचा उत्साह उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान, पैशांचे व्यवस्थापन, ग्राहकांशी संवाद आणि विक्री कौशल्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. तसेच रानभाज्यांचे पौष्टिक महत्त्व, त्यांची ओळख, कमी खर्चात उपलब्ध होणारा सकस आहार आणि स्थानिक जैवविविधतेचे महत्त्व याविषयीही विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण झाली.
महोत्सवाला कुणकेश्वर विभागाचे जिल्हा परिषद सदस्य सुनीलभाई पारकर आणि मुणगे गण पंचायत समिती सदस्य सदाशिव ओगले यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी खुडीचे सरपंच दीपक कदम, उपसरपंच शशिकांत कावले, मिठबाव प्रभाग विस्तार अधिकारी प्रणाली मराठे, कोटकामते केंद्रप्रमुख कालिंदी माणगावकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुमित जोईल, उपाध्यक्षा प्रेरणा घाडी, समिती सदस्य, पोलीस पाटील मृण्मयी आरेकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष अनंत वायंगणकर, मंगेश आरेकर, जगदाळे, कवर सर तसेच अंगणवाडी सेविका धुरी मॅडम, पाडावे मॅडम, गुळेकर मॅडम, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि शाळेचे माजी विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थितांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत रानभाज्यांची खरेदी करून उपक्रमाला प्रोत्साहन दिले.
या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका विनिता दुखंडे, पदवीधर शिक्षिका स्मिता कदम, पदवीधर शिक्षक योगेश पाटील, सहाय्यक शिक्षक विजय माने तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतले.