देवगड: प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात मीठमुंबरी ग्रामसभेचा एकमताने ठराव

शेअर करा

शेती, मत्स्यव्यवसाय, पर्यावरण आणि भावी पिढ्यांच्या हितासाठी ग्रामस्थांची ठाम भूमिका; शासनाला ठराव पाठविणार

देवगड,दि.१३ जुलै

देवगड तालुक्यातील मीठमुंबरी ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयोजित विशेष ग्रामसभेत प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाच्या अनुषंगाने सखोल चर्चा करण्यात आली. या ग्रामसभेला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. विविध नागरिकांनी आपल्या भावना, शंका आणि भूमिका मांडल्यानंतर अखेर ग्रामसभेत प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पास विरोध करणारा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
ग्रामस्थांनी मंजूर केलेल्या ठरावात गावातील शेती, आंबा-काजू बागायती, मत्स्यव्यवसाय, पर्यावरण, जैवविविधता, पर्यटन तसेच भावी पिढ्यांच्या हिताचा विचार करून मीठमुंबरी गावात किंवा परिसरात अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यात येऊ नये, अशी स्पष्ट भूमिका नोंदविण्यात आली.
यावेळी ग्रामस्थांनी विकासाच्या नावाखाली स्थानिकांच्या जीवनमानावर, रोजगारावर आणि नैसर्गिक संपत्तीवर परिणाम करणारे कोणतेही निर्णय स्थानिकांची संमती न घेता घेऊ नयेत, अशी मागणीही केली. गावाच्या भविष्याशी संबंधित कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना स्थानिक नागरिकांचा विश्वासात घेणे आवश्यक असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.
ग्रामसभेत मंजूर झालेला ठराव संबंधित शासकीय विभाग, जिल्हाधिकारी तसेच राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असून, ग्रामस्थांच्या एकमताने व्यक्त झालेल्या भूमिकेचा आदर करून प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाबाबत योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
लोकशाही प्रक्रियेतून ग्रामसभेने एकमुखाने घेतलेला हा निर्णय मीठमुंबरी ग्रामस्थांच्या सामूहिक भूमिकेचे प्रतीक असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

शेअर करा