नगरसेविका तन्वी चांदोस्कर यांनी केली तात्पुरती व्यवस्था; लवकरच अंगणवाडीची दुरुस्ती होणार
देवगड,दि.१४ ऑगस्ट
जामसंडे वेळवाडी येथील अंगणवाडीत आज सकाळी वानराने अक्षरशः धुडगूस घातल्याने अंगणवाडीच्या छप्पराचे नुकसान झाले. छप्पराचे नुकसान झाल्यामुळे पावसाचे पाणी अंगणवाडीत आल्याने तेथील लहान मुलांना त्रास सहन करावा लागला.
अंगणवाडी सेविकेने याबाबत जामसंडे नगरपंचायतीच्या स्थानिक नगरसेविका तथा पाणीपुरवठा सभापती सौ. तन्वी चांदोस्कर यांना माहिती दिली. माहिती मिळताच त्यांनी तातडीने अंगणवाडीची पाहणी केली. त्यानंतर नगरपंचायतीमार्फत ताडपत्री उपलब्ध करून देत कर्मचाऱ्यांच्या मदतीने ती छतावर बसवून घेतली. त्यामुळे अंगणवाडीत येणाऱ्या पावसाच्या पाण्याचा तात्पुरता प्रश्न मार्गी लागला आहे.
अंगणवाडीच्या छप्पराची कायमस्वरूपी दुरुस्ती लवकरच करून घेण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या सन २०२५-२६ अंतर्गत पालकमंत्री ना. नितेशजी राणे यांच्या माध्यमातून या अंगणवाडीच्या कामासाठी २ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे लवकरच आवश्यक दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन अंगणवाडीतील मुलांना सुरक्षित वातावरण उपलब्ध होणार आहे.