लुम्बिनी बुद्ध विहार, दीक्षाभूमी वाडे येथे संजय जाधव यांचे प्रतिपादन; बौद्ध धम्मात महान सामाजिक तत्त्वज्ञान असल्याचे केले स्पष्ट.
देवगड,दि.२४ ऑक्टोंबर
-डॉ.बाबासाहेबांची धम्मक्रांती पद, पैसा, प्रतिष्ठा किंवा राजसत्ता याकरीता नव्हती तर समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व न्याय यासाठी होती. बौद्ध धम्मात महान सामाजिक तत्त्वज्ञान आहे. डॉ. बाबासाहेब यांनी दिलेल्या धम्मामुळे नवजीवन मिळाले असे प्रतिपादन बौद्धाचार्य, माजी श्रामणेर, केंद्रीय शिक्षक तसेच समता सैनिक दलाचे सीनियर डिव्हिजन ऑफिसर मा. संजय जाधव यांनी मंगळवारी दीक्षाभूमी वाडे येथील लुम्बिनी बुद्ध विहारात प्रमुख मार्गदर्शक म्हणून केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवा संघाचे अध्यक्ष डी.के.पडेलकर होते तर देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मान. श्याम बुवा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रमुख मानवंत म्हणून वाडे गावचे पोलीस पाटील- महेंद्र मांजरेकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष- संजय तावडे, माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष मनोहर परब ,प्रबुद्ध विकास मंडळ वाडे यांचे मुंबई अध्यक्ष बबन वाडेकर, सचिव रविकांत वाडेकर, ग्रामीण अध्यक्ष पि.के. वाडेकर, सचिव जयवंत वाडेकर,सेवा संघाचे कार्याध्यक्ष के. एस.कदम, खजिनदार उत्तम कांबळे, सहचिटणीस दिलीप वाडेकर,हिशेब तपासणीस सत्यवान पेंढारकर,सल्लागार अनिल पुरळकर, किशोर कांबळे, संजय कांबळे, महिला अध्यक्षा अर्पिता साळुंखे, कार्याध्यक्षा सुरभी पुरळकर, संतोष गिरकर, विजय कोंडकर, सेवा संघाच्या गाव शाखांचे पदाधिकारी व प्रबुद्ध विकास मंडळ वाडे यांच्या मुंबई शाखेचे बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी प्रबुद्ध विकास मंडळाच्या अध्यक्षांचे हस्ते धम्म ध्वजारोहन करण्यात आले. त्यानंतर वाडे येथील मुख्य चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मृती स्तंभाला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तदनंतर गौतम बुद्ध, सम्राटअशोक,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून तसेच दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपस्थित उपासिका, उपासिकांनी त्रिसरण, पंचशील ग्रहण केल्यानंतर मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सेवा संघाचे सचिव मनोहर सावंत यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

मान.संजय जाधव यांनी आपल्या भाषणात, सेवा संघ व प्रबुद्ध विकास मंडळ वाडे यांच्या कार्याचे कौतुक करून डॉ. बाबासाहेबांची धम्मक्रांती ही मानवाला मानसिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी होती असे मत व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की,रक्ताचा एकही थेंब न सांडता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली धम्मक्रांती ही जगातील समस्त शोषित, पीडितांनी माणुसकीच्या हक्कासाठी,स्वाभिमानी प्रतिष्ठित जीवन जगण्यासाठी, पुकारलेल्या लढ्याचे प्रतिबिंब होते. जगामध्ये झालेली फ्रेंच राज्यक्रांती आणि रशियन राज्यक्रांती यापेक्षा बाबासाहेबांच्या या धार्मिक धम्मक्रांतीचे महत्व वैशिष्ट्यपूर्ण आहे. डॉ.बाबासाहेबांची धम्मक्रांती अतिशय वरच्या श्रेणीची आहे.भगवान बुद्धाचा धम्म हा मानवाला सत्य,अहिंसा, करुणा आणि मानवता शिकवतो. मान. संजय जाधव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २० मार्च १९२७ रोजी समता सैनिक दलाची स्थापना करण्यामागे विषमते विरुद्ध लढणे, समता स्थापन करणे, आंबेडकरी जनतेचे संरक्षण करणे, वंश- धर्म जातपात-लिंगभेद या वर्गावर आधारित विषमता नष्ट करणे, देशात व समाजात समता स्थापन करणे, समता – स्वतंत्र- बंधुत्व या पायावर नवीन समाज रचना निर्माण करणे,समता सैनिक दलाची पोलादी एकजूट करणे, चळवळीच्या नेत्यांचे संरक्षण करणे, चळवळीचे कवच बनून राहणे, व्यसनमुक्त समाज निर्माण करणे, संकटसमयी सेवेस तत्पर राहणे, तरुणांची पोलादी ताकद निर्माण करणे,चळवळीत निर्माण केलेल्या संस्थांचं संरक्षण करणे इ. उद्देश असल्याचे स्पष्ट केले.
प्रमुख अतिथी मान.श्याम बुवा यांनी धम्मचक्र प्रवर्तनाचे महत्त्व केवळ धर्मांतरा पुरतेस मर्यादित नसून ती वैचारिक व सामाजिक क्रांती होती, जल्लोषाबरोबरच वैचारिक जागर होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी अनिल पुरळकर,अर्पिता साळुंखे, सुरभी पुरळकर, रविकांत वाडेकर यांनी शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले. उपस्थितांमध्ये भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक मोहन सावंत,वंदना सावंत, बौद्धाचार्य अनिल मुंबरकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सेवा संघाचे सचिव मनोहर सावंत यांनी केले.