हवामानातील बदलांवर मात करत आंबा बागायतदारांची मेहनत फळाला; देवगडच्या हापूस हंगामाला सुरुवात
देवगड,दि.२९ ऑक्टोंबर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील विजयदुर्ग घरीवाडी येथील आंबा बागायतदार निलेश बांधकर आणि विद्याधर बांधकर यांच्या बागेतील यंदाच्या हापूस हंगामातील पहिली आंब्याची पेटी मुंबई वाशी मार्केटच्या दिशेने रवाना झाली आहे. हापूसच्या पहिल्या पेटीला बाजारपेठेत पाठविण्याचा मान बांधकर बंधूंना मिळाला असून, यामुळे देवगडच्या आंबा हंगामाची उत्साहात सुरुवात झाली आहे.

यंदा हवामानातील बदलांचे आव्हान असतानाही बांधकर बंधूंनी घेतलेल्या विशेष मेहनतीमुळे आंबा वेळेत तयार झाला. देवगडच्या प्रसिद्ध हापूस आंब्याची पहिली पेटी मुंबईच्या बाजारपेठेत दाखल होणार असल्याने आंबा व्यावसायिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. हापूसच्या पहिल्या पेटीच्या रवाना होण्याने तालुक्यातील आंबा हंगामाला सुरुवात झाल्याचे चित्र असून, आगामी काळात आंबा बाजारपेठेत आवक वाढण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.