नगरसेविका प्रणाली माने यांचा कॅशबुकच्या प्रती न दिल्याबाबत सवाल; मुख्याधिकारी हरिदत्त माने यांनी माहिती न लपवल्याचे केले स्पष्ट
देवगड,दि.२९ ऑक्टोंबर
देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत समुद्रकिनारा स्वच्छता अभियानाच्या खर्चावरून जोरदार चर्चा रंगली, तर शहरातील पाणीपुरवठा, वाढते डेंग्यूचे रुग्ण, अतिक्रमण आणि स्वच्छतेच्या प्रश्नांवरही सदस्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. नगरसेविका प्रणाली माने यांनी स्वच्छता अभियानाच्या खर्चाचा लेखी हिशोब मागूनही तो का देण्यात आला नाही, असा सवाल उपस्थित करत कॅशबुकच्या झेरॉक्स प्रती न दिल्याबाबत आक्षेप घेतला. कॅशबुकमध्ये घोटाळा असल्यामुळेच प्रती दिल्या जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही माहिती लपवली जात नसल्याचे मुख्याधिकारी हरिदत्त माने यांनी स्पष्ट केले. या विषयावर सभागृहात बराच वेळ चर्चा झाल्याने सभेचे वातावरण चांगलेच तापले.
देवगड-जामसंडे नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपनगराध्यक्ष मिताली सावंत, पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोस्कर, स्वच्छता सभापती निवृत्ती तारी, मुख्याधिकारी हरिदत्त माने यांच्यासह नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.
देवगड-जामसंडे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दहिबाव योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. उर्वरित पाईपलाईनचे काम भूमिगत स्वरूपाचे असल्याने शहरातील पाणीपुरवठा अनियमित होत असल्याचे पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोस्कर यांनी सभागृहात स्पष्ट केले. सध्याच पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन केले नाही, तर एप्रिल-मे महिन्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्याच्या प्रस्तावाला सभागृहाने सर्वानुमते मंजुरी दिली.
स्वच्छता अभियानाच्या खर्चावरून प्रणाली माने यांचा प्रशासनाला जाब
१९ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित समुद्रकिनारा स्वच्छता अभियानाच्या खर्चावरून सभेत वाद निर्माण झाला. या अभियानाचा खर्च कशा पद्धतीने करण्यात आला, याचा लेखी हिशोब मागूनही आपल्याला का देण्यात आला नाही, असा सवाल नगरसेविका प्रणाली माने यांनी उपस्थित केला. सदस्यांना मागितलेल्या माहितीच्या झेरॉक्स प्रतींसाठी खर्च मागणे अन्यायकारक असल्याचे सांगत, प्रशासनाने लोकप्रतिनिधींना शब्दांत गुंडाळण्याचा प्रयत्न करू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. कॅशबुकमध्ये घोटाळा असल्यामुळेच त्याच्या प्रती दिल्या जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
यावर नगरपंचायत प्रशासनाने अभियानासाठी १ लाख ३५ हजार रुपयांची जमा नोंद असून, त्यापैकी १ लाख २१ हजार १३० रुपये खर्च झाल्याचे स्पष्ट केले. तसेच कर्मचाऱ्यांवर खर्च करण्याच्या मर्यादेबाबत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर मुख्याधिकारी हरिदत्त माने यांनी ५ हजार रुपयांच्या आतील रक्कम खर्च करता येत असल्याचे सांगितले. प्रशासन कोणतीही माहिती लपवत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या विषयावर बराच वेळ चर्चा झाल्यानंतर सभागृहाने पुढील विषयांकडे वळण्याचा निर्णय घेतला.
सुका कचरा विक्री आणि मशीन भाड्याच्या प्रस्तावाला मंजुरी
‘मे. ओम साई स्क्रॅप रिसायकलिंग’ संदर्भातील सुका कचरा विक्री तसेच देवगड-जामसंडे नगरपंचायतीकडून मशीन भाड्याने देण्याच्या विषयावर सभागृहात विचारविनिमय करण्यात आला. चर्चेनंतर या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
शाळेला निधी देण्यावर चर्चा; अन्य शाळांवरील अन्यायाचा मुद्दा
श्रीराम मोरेश्वर गोगटे हायस्कूल येथे आयोजित विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी आर्थिक निधी देण्याचा विषय सभेत मांडण्यात आला. यावेळी नगरसेवक नितीन बांदेकर यांनी केवळ एका कार्यक्रमाला निधी दिल्यास अन्य शाळांवर अन्याय होऊ शकतो, अशी सूचना केली. चर्चेनंतर संबंधित कार्यक्रमासाठी निधी देण्यास मंजुरी देण्यात आली.
देवगड-जामसंडे शहरात फिश मार्केट उभारण्यासाठी देवगड खालची बाजारपेठ येथील जुन्या भाजी मार्केटची जागा निश्चित करण्यात आल्याची माहिती सभेत देण्यात आली.
तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियानांतर्गत शहरातील आठवडा बाजार परिसरात आणि निर्मला देवी मंदिर परिसरात सुलभ शौचालय उभारणे, पर्यटकांसाठी बेंचची व्यवस्था करणे तसेच हायमास्ट दिवे बसविणे या कामांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. मात्र, नवीन शौचालये उभारण्याबरोबरच जुन्या शौचालयांच्या दुरवस्थेकडेही प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी स्वीकृत नगरसेवक चंद्रकांत कावले यांनी केली.
शहरातील डेंग्यूच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता
देवगड-जामसंडे शहरात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचा मुद्दा नगरसेवक नितीन बांदेकर यांनी उपस्थित केला. डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. शहरातील आरोग्यविषयक परिस्थिती गांभीर्याने घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरजही यावेळी अधोरेखित झाली.
खुल्या जागांवरील अतिक्रमणांवर महिनाभरात कारवाई
शहरातील खुल्या जागांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचा मुद्दा नगरसेवक संतोष तारी यांनी उपस्थित केला. या अतिक्रमणांवर प्रशासन कोणती कारवाई करणार, असा सवाल त्यांनी केला. त्यावर मुख्याधिकारी हरिदत्त माने यांनी एका महिन्यात अतिक्रमणांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन सभागृहात दिले.
ग्रामीण भागातील अस्वच्छतेचा मुद्दाही ऐरणीवर
नगरपंचायत क्षेत्रातील ग्रामीण भागातील रस्त्यांवर अस्वच्छता असल्याचा तसेच काही कर्मचारी दुपारनंतर प्रभागात फिरकत नसल्याचा आरोप स्वीकृत नगरसेवक चंद्रकांत कावले यांनी केला. यावर मुख्याधिकारी हरिदत्त माने यांनी कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावे द्यावीत, संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.
एकूणच, देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या या सर्वसाधारण सभेत स्वच्छता अभियानाच्या खर्चापासून ते पाणीपुरवठा, आरोग्य, अतिक्रमण आणि शहराच्या विकासकामांपर्यंत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. काही विषयांवर सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारला, तर काही विकासकामांना सभागृहाने मंजुरी दिली.