बनावट दारूमुळे तांडेल-खलाशांचे मृत्यू, किडनी विकारांसह गंभीर आजार वाढल्याचा आरोप; देवगड पोलीस ठाण्यात निवेदन सादर
देवगड,दि.२६ मे
गोवा राज्यातून बेकायदेशीररीत्या आणली जाणारी बनावट दारू देवगड बंदर जेट्टी परिसरात मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याचा गंभीर आरोप देवदुर्ग मच्छीमार सहकारी संस्थेने केला आहे. स्वस्त दरात उपलब्ध होत असल्यामुळे ही दारू बोटीवरील तांडेल, खलाशी तसेच काही नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात सेवन केली जात असल्याचे संस्थेने म्हटले आहे.
या बनावट दारूमुळे हात, पाय व तोंडाला सूज येणे, किडनीचे विकार होणे यांसारखे गंभीर आजार उद्भवत असून गेल्या पाच वर्षांत अनेक तांडेल व खलाशांचा मृत्यू झाल्याचा दावा संस्थेने केला आहे. त्यामुळे अनेक मच्छीमार कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले असून काही कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सदर दारूची विक्री पूर्णपणे बेकायदेशीर असून शासनाची कोणतीही मान्यता नसताना खुलेआम विक्री सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे गोवा बनावटीच्या या दारूविरोधात तात्काळ छापेमार कारवाई करून विक्री कायमस्वरूपी बंद करण्यात यावी, अशी मागणी देवदुर्ग मच्छीमार सहकारी संस्थेच्या सर्व सभासद मच्छीमारांनी केली आहे.
या संदर्भात संस्थेच्या वतीने देवगड पोलीस ठाण्यात निवेदन सादर करण्यात आले असून संबंधित विभागांना कठोर कारवाईचे आदेश द्यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे. शासनाने या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन बनावट दारू विक्रीवर बंदी घालावी, अशी मागणी मच्छीमार बांधवांकडून करण्यात येत आहे.