देवगड किनाऱ्यावर ऑक्सिजन सिलेंडर आणि संशयास्पद साहित्य आढळल्याने खळबळ

शेअर करा

देवगड,दि.१८ जुलै

देवगड तालुक्यातील कातवण समुद्रकिनाऱ्यावर शनिवारी दुपारच्या सुमारास एका स्थानिक मच्छीमाराला दोन ऑक्सिजन सिलेंडर आणि काही संशयास्पद साहित्य आढळून आल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली. मच्छीमाराने याबाबतची माहिती तातडीने देवगड पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संपूर्ण साहित्य ताब्यात घेतले

पोलीस निरीक्षक श्याम बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने घटनास्थळी पंचनामा केला. यावेळी सापडलेल्या वस्तूंमध्ये दोन ऑक्सिजन सिलेंडर, पाण्याच्या बाटल्या, प्रोटीन बिस्किटांचे पॅकेट, स्मोक सिग्नल, हँड फ्लेअर तसेच इतर काही साहित्य असल्याचे निष्पन्न झाले. पुढील तपासासाठी फॉरेन्सिक पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले.

प्राथमिक तपासात हे साहित्य समुद्री वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या एखाद्या जहाज किंवा बोटीवरून समुद्रात पडले असावे आणि भरतीच्या पाण्याबरोबर किनाऱ्यावर वाहत आले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, या घटनेचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून कोणतीही बाब दुर्लक्षित केली जाणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

दरम्यान, किनारपट्टीवर कोणतीही संशयास्पद हालचाल अथवा वस्तू आढळल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन देवगड पोलिसांकडून करण्यात आले आहे.

शेअर करा