दुर्दैवी अपघातातील मृताच्या कुटुंबीयांना न्याय व आर्थिक मदत देण्याची मागणी; भावनिक प्रतिक्रियांपेक्षा ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना राबविण्याचे आवाहन.
देवगड,दि.१२ जुलै
मोकाट जनावरामुळे झालेल्या अपघातात एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून, मृताच्या कुटुंबीयांना न्याय आणि आर्थिक मदत मिळालीच पाहिजे. मात्र अशा घटनांनंतर केवळ भावनिक प्रतिक्रिया देण्यापेक्षा वास्तव परिस्थितीचा विचार करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत महाराष्ट्र लोकअधिकार समितीचे अध्यक्ष अॅड. प्रसाद करंदीकर यांनी व्यक्त केले आहे.
या प्रकरणात काही लोकप्रतिनिधींनी दोषींवर कारवाईची मागणी केली असली, तरी संबंधित मोकाट जनावराचा मालक कोण आहे, याची कोणतीही अधिकृत नोंद उपलब्ध नसल्याने नेमकी कारवाई कोणावर करायची, हा मूलभूत प्रश्न असल्याचे त्यांनी नमूद केले. जनावराची ओळख पटविण्याची कोणतीही प्रभावी व्यवस्था नसताना केवळ पोलिसांवर कारवाईचा दबाव आणून प्रश्न सुटणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
करंदीकर यांनी सांगितले की, पोलिस यंत्रणा उपलब्ध पुरावे आणि कायद्याच्या चौकटीत काम करते. त्यामुळे अशा घटनांमध्ये व्यक्तींना लक्ष्य करण्यापेक्षा व्यवस्थेतील त्रुटी दूर करणे अधिक महत्त्वाचे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी मोकाट जनावरांची अनिवार्य नोंदणी, कानावर ओळख टॅग लावण्याची व्यवस्था, नियंत्रणासाठी स्वतंत्र यंत्रणा आणि जनावरांच्या मालकांची जबाबदारी निश्चित करणारे नियम लागू करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.
तसेच, अपघातग्रस्त कुटुंबांना तातडीने आर्थिक मदत व नुकसानभरपाई मिळावी, यासाठीही प्रभावी यंत्रणा उभारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
दुर्दैवी घटनांचे राजकारण करण्यापेक्षा भविष्यात अशा अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना राबविणे ही लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची सामूहिक जबाबदारी असल्याचे अॅड. प्रसाद करंदीकर यांनी सांगितले. त्यांच्या मते, समाजाला घोषणांपेक्षा उत्तरदायित्व, नियोजन आणि प्रभावी कृतीची अधिक आवश्यकता आहे.