महाराष्ट्र पोलीस राजपत्रात आदेश प्रसिद्ध; पोलीस आस्थापना मंडळाच्या निर्णयानुसार बदली
देवगड,दि.०६ ऑगस्ट
देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शाम विनायकराव बुवा यांची पुणे ग्रामीण येथे बदली करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या मंजुरीनंतर महाराष्ट्र पोलीस राजपत्रात याबाबतचे आदेश प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
दिनांक ६ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या महाराष्ट्र पोलीस राजपत्रानुसार, महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ मधील तरतुदींनुसार पोलीस आस्थापना मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार ही बदली करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांच्या प्रक्रियेत देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शाम विनायकराव बुवा यांची पुणे ग्रामीण येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
शाम बुवा यांनी देवगड येथे कार्यरत असताना कायदा व सुव्यवस्था राखणे, विविध गुन्ह्यांचा तपास, तसेच नागरिकांशी समन्वय राखत पोलीस प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी काम केले. त्यांच्या बदलीमुळे देवगड पोलीस ठाण्याच्या प्रभारी पदावर कोणाची नियुक्ती होणार, याकडे आता तालुकावासियांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, पोलीस विभागाकडून लवकरच नव्या पोलीस निरीक्षकाची नियुक्ती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.