देवगड: कुणकेश्वर येथे श्रावणी सोमवार उत्सवाची जय्यत तयारी

शेअर करा

भाविकांच्या सोयीसाठी मंडप, दर्शनरांगा, पार्किंगसह चोख पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था

देवगड,दि. १६ ऑगस्ट

श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे श्रावण महिन्यातील श्रावणी सोमवार उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून, यंदाही भाविकांच्या उपस्थितीत हा उत्सव उत्साहात साजरा होणार आहे. श्रावणी सोमवारनिमित्त मंदिर परिसरात भाविकांच्या सोयीसाठी विविध व्यवस्था करण्यात आल्या आहेत.
भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे यासाठी मंडप उभारून दर्शनरांगांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त, वाहतूक नियंत्रण आणि पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. स्वयंसेवकांचेही नियोजन करण्यात आले असून प्रत्येक सोमवारी मंदिरात विविध भजन मंडळांचे कार्यक्रम होणार आहेत.
दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दानशूर देणगीदारांच्या सहकार्याने मोफत साबुदाणा खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांना दर्शनासोबतच प्रसादाची सुविधाही उपलब्ध होणार आहे.
उद्या, १७ ऑगस्ट रोजी श्री कुणकेश्वर मंदिरात पहाटे ५ वाजता जिल्हाधिकारी सौ. तृप्ती धोंडमिसे, सहाय्यक धर्मादाय आयुक्त सौ. अवंतिका कुलकर्णी तसेच प्रसिद्ध उद्योजक श्री. संजय लक्ष्मण गावडे यांच्या हस्ते श्री कुणकेश्वराची प्रथम पूजा होणार आहे.
श्रावणी सोमवारनिमित्त देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून विविध लोकहितार्थ व सामाजिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वयंभू श्री देव कुणकेश्वराचे दर्शन घ्यावे, असे आवाहन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री. एकनाथ केशव तेली यांनी केले आहे.

शेअर करा