कोंडवाडा उभारणी, गुरांची नोंदणी, टॅगिंग आणि विशेष पथकाची मागणी; अन्यथा जनहित याचिकेचा इशारा
देवगड,दि.१३ जुलै
देवगड-जामसंडे शहरातील मोकाट जनावरांच्या वाढत्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नागरिक, व्यापारी, लोकप्रतिनिधी आणि नगरपंचायत प्रशासन यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. अलीकडेच मोकाट जनावरामुळे झालेल्या अपघातात एका नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, या प्रश्नावर तातडीने आणि प्रभावी उपाययोजना करण्याची जोरदार मागणी करण्यात आली.
बैठकीत प्रा. गुरुदेव परुळेकर यांनी मोकाट जनावरे निर्मूलनासाठी तयार करण्यात आलेला कृती आराखडा सादर केला. त्यानुसार पुढील ३० दिवसांत शहरातील मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम राबविणे, गुरांची नोंदणी करणे, टॅगिंगची प्रक्रिया पूर्ण करणे, तात्पुरता अथवा कायमस्वरूपी कोंडवाडा उभारणे, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मालकांवर दंडात्मक कारवाई करणे आणि नागरिकांसाठी तक्रार निवारण यंत्रणा सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
या मागण्यांची ३० दिवसांत अंमलबजावणी न झाल्यास प्रशासनाविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशाराही बैठकीत देण्यात आला. तारामुंबरीसह इतर भागांतून शहरात येणाऱ्या मोकाट जनावरांबाबतही ठोस कारवाईची आवश्यकता असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले.
यावेळी मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी मोकाट जनावरे पकडण्यासाठी स्वतंत्र पथक स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती दिली. पकडलेल्या जनावरांसाठी तात्पुरत्या स्वरूपात कोंडवाड्याची व्यवस्था करण्यात येणार असून, कायमस्वरूपी कोंडवाडा उभारण्यासाठीही आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. गुरांच्या टॅगिंगबाबतही कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीत नगराध्यक्ष साक्षी प्रभू, उपनगराध्यक्ष मिताली सावंत, स्वच्छता सभापती बुवा उर्फ निवृत्ती, पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोस्कर, नगरसेवक तसेच विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, रिक्षाचालक संघटना, नागरिक आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची वेळेत अंमलबजावणी करून शहरातील मोकाट जनावरांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी एकमुखी मागणी केली.