प्रथम कोंडवाडा उभारण्याची प्रमुख मागणी; मोकाट जनावरांवर नियंत्रणासाठी ३० दिवसांचा कृती आराखडा जाहीर करण्याची नागरिकांची मागणी, मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन.
देवगड,दि.१२ जुलै
मोकाट जनावरांच्या वाढत्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ’प्रथम कोंडवाडा उभारावा’ या प्रमुख मागणीसह उद्या देवगड-जामसंडे नगरपंचायतीत नागरिक प्रशासन व लोकप्रतिनिधींची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान मोकाट जनावरांचा टप्प्याटप्प्याने बंदोबस्त करण्यासाठी नगरपंचायतीने ३० दिवसांचा कृती आराखडा (ॲक्शन प्लॅन) जाहीर करावा, अशीही मागणी करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या संदर्भात देवगड येथील गणेश मंदिरात नागरिकांची बैठक पार पडली. बैठकीत निवृत्त प्राध्यापक जी. टी. परुळेकर यांनी मोकाट जनावरांचा प्रश्न सोडविण्यासाठी नगरपंचायतीने ३० दिवसांचा ठोस आराखडा तयार करण्याची मागणी केली. अण्णा खवळे यांनी अलीकडील दुर्दैवी घटनेस प्रशासन जबाबदार असल्याचे सांगत, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने नागरिकांशी नियमित संवाद साधून केलेल्या उपाययोजनांची माहिती द्यावी, अशी मागणी केली. शामल जोशी यांनी शासकीय वापरात नसलेल्या इमारतीचा कोंडवाड्यासाठी उपयोग करण्याचा प्रस्ताव मांडत, त्याची संपूर्ण जबाबदारी नगरपंचायतीने स्वीकारावी, असे सांगितले. समाजसेवक नंदकुमार घाटे यांनी हा प्रश्न सोडविण्याची जबाबदारी नगरपंचायत, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांची संयुक्त असल्याचे नमूद करत लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली.
बैठकीस प्रा. जी. टी. परुळेकर, शामल जोशी, अण्णा खवळे, प्रकाश गोगटे, वीरेंद्र कार्लेकर, सुधीर मांजरेकर, रवी चांदोसकर, राजेंद्र पाटील, सुभाष धुरी, प्रशांत वारीक, दयानंद पाटील, राजू सावंत, शरद लाड यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. बैठकीचे आयोजन निवृत्त शिक्षक नाना सारंग यांनी केले.