देवगड, दि. ९ जुलै
“रोटरी क्लब ही जगभर कार्यरत असलेली अत्यंत विश्वासार्ह, सेवाभावी आणि मानवतावादी संस्था आहे. ‘सेवेपेक्षा श्रेष्ठ काहीही नाही’ हा विचार घेऊन रोटरीने समाजातील प्रत्येक घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचविला आहे. आरोग्य, शिक्षण, पर्यावरण संवर्धन, महिला व बालकल्याण, युवक सक्षमीकरण, आपत्ती व्यवस्थापन तसेच पोलिओ निर्मूलन यांसारख्या विविध क्षेत्रांत रोटरीचे कार्य प्रेरणादायी व उल्लेखनीय आहे. समाजातील गरजू, वंचित आणि दुर्बल घटकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्याचे सामर्थ्य रोटरीमध्ये आहे,” असे प्रतिपादन प्रमुख अतिथी तथा इन्स्टॉलिंग ऑफिसर डॉ.मंजू फडके यांनी केले.

देवगड येथील इंद्रप्रस्थ सभागृहात रोटरी क्लब ऑफ मँगो सिटीच्या सन २०२६-२७ च्या पदग्रहण सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी असिस्टंट गव्हर्नर संजय रावराणे, प्रणय तेली, शशिकांत चव्हाण नूतन अध्यक्षा अनुश्री पारकर, मावळते अध्यक्ष गौरव पारकर, सचिव दयानंद पाटील तसेच विविध रोटरी क्लबचे पदाधिकारी, सदस्य, हितचिंतक आणि जिल्ह्यातील अनेक रोटेरियन उपस्थित होते.
पुढे बोलताना मंजू फडके म्हणाल्या, “रोटरीच्या माध्यमातून प्रत्येकाला निःस्वार्थ भावनेने समाजासाठी कार्य करण्याची संधी मिळते. समाजहितासाठी केलेली मदत हेच खरे पुण्य असून, प्रत्येकाने रोटरीच्या सेवाभावी उपक्रमांना सहकार्य करून समाजकार्यात आपले योगदान द्यावे. देवगड रोटरी क्लब ऑफ मँगो सिटीने आतापर्यंत अनेक लोकोपयोगी उपक्रम यशस्वीपणे राबवून समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे. नवनिर्वाचित अध्यक्षा अनुश्री पारकर व त्यांच्या संपूर्ण कार्यकारिणीच्या नेतृत्वाखाली क्लबची सेवाभावी वाटचाल अधिक व्यापक आणि गतिमान होईल. समाजसेवेची ही परंपरा अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने पुढे यावे.”तसेच श्री अशोक मुजुमुले यांचा यावर्षी चा रोटरी वोकेशनल अवार्ड देवून सन्मानित केले.

यावेळी तालुक्यातील दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा रोटरी क्लबच्या वतीने गौरव करण्यात आला. दहावीत शंभर टक्के गुण मिळविणाऱ्या शेठ म ,ग हायस्कूलच्या राज्ञी कुलकर्णी, देवगड इंग्लिश स्कूलची स्वरा सावंत, जामसंडे हायस्कूलची प्रियंका माळी तसेच केळकर महाविद्यालयातील बारावी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या मुक्ता सारंग, कीर्ती पुजारी, सिद्धी कदम आदी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मावळते अध्यक्ष गौरव पारकर यांनी आपल्या कार्यकाळातील विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व पर्यावरण विषयक उपक्रमांचा आढावा घेत सर्व सदस्यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. क्लबने राबविलेल्या सेवाभावी उपक्रमांना समाजातून मिळालेला प्रतिसाद हीच पुढील कार्याची प्रेरणा असल्याचे त्यांनी सांगितले.
नूतन अध्यक्षा अनुश्री पारकर यांनी आपल्या मनोगतात, “रोटरीच्या प्रत्येक सदस्याला सोबत घेऊन अधिकाधिक लोकाभिमुख व समाजोपयोगी उपक्रम राबविण्यास प्राधान्य देणार आहे. आरोग्य, शिक्षण, पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण, युवक विकास आणि गरजूंसाठी विविध सेवा प्रकल्प प्रभावीपणे राबवून रोटरीचे कार्य देवगड तालुक्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याचा प्रयत्न राहील. टीमवर्क, पारदर्शकता आणि सेवाभाव या तत्त्वांवर क्लबची वाटचाल अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे,” असे सांगितले.
सचिव दयानंद पाटील यांनी उपस्थित मान्यवर, रोटेरियन, हितचिंतक व नागरिकांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल गांधी व मनस्वी घारे यांनी केले.