पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना; सरसकट मदतीसाठी प्रशासनाने कार्यवाही करण्याचे आवाहन
देवगड,दि.२९ सप्टेंबर
पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी सोमवारी शिरगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून शेतीच्या नुकसानीची पाहणी केली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य सावी लोके, देवदत्त कदम, शिरगाव पंचायत समिती सदस्य शितल तावडे, तळवडे पंचायत समिती सदस्य सलोनी तळवडेकर, मिलिंद साटम यांच्यासह शेतकरी संतोष तावडे, उमेश घाडी तसेच कृषी मंडळ अधिकारी लांबडे आणि कृषी सहाय्यक उपस्थित होते.
परिसरातील विविध शेतांमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी करून संदीप साटम यांनी उपस्थित कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आणि सरसकट मदत मिळण्यासाठी प्रशासनातील सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांच्या समस्या जाणून घेत प्रशासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.