आरोग्य शिबिर, शैक्षणिक साहित्य वाटप, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना मदत आणि मच्छिमारांसाठी विशेष उपक्रमांचे आयोजन
देवगड, दि. १८ जून
महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या २३ जून रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी देवगड-जामसंडे शहराच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वाढदिवस केवळ उत्सव म्हणून न साजरा करता समाजहिताचे उपक्रम राबवून नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा शहराध्यक्ष वैभव करंगुटकर यांनी दिली.
या उपक्रमांची सुरुवात रविवार, २१ जून रोजी होणार असून मत्स्य विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांबाबत विशेष शिबिराचे आयोजन सांस्कृतिक भवन, जामसंडे येथे सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ देवगड-जामसंडे शहरातील मच्छिमार बांधवांनी घ्यावा, असे आवाहन भाजपा मंडल अध्यक्ष राजा भुजबळ, शहराध्यक्ष वैभव करंगुटकर तसेच युवा मोर्चा शहराध्यक्ष दया पाटील यांनी केले आहे.
त्यानंतर २२ जून रोजी प्रभाग क्रमांक १ मध्ये भाजपा शहराध्यक्ष वैभव करंगुटकर आणि माजी नगरसेवक संजय तारकर यांच्या पुढाकारातून सर्व नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
२३ जून रोजी मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दिवसभर विविध सामाजिक, शैक्षणिक आणि लोककल्याणकारी कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. सकाळी ८ वाजता श्री देव ब्राम्हणदेव मंदिर येथे त्यांच्या दीर्घायुष्यासाठी विशेष अभिषेक करण्यात येणार आहे.
याच दिवशी श्रीराम मोरेश्वर गोगटे विद्यालयातील पाच गरीब व गरजू विद्यार्थ्यांचा वर्षभराचा संपूर्ण शैक्षणिक खर्च भाजपा शहराध्यक्ष वैभव करंगुटकर यांच्या सौजन्याने उचलण्यात येणार आहे.
प्रभाग क्रमांक ३ मध्ये नगरसेविका ऋचाली दिनेश पाटकर यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा खाकशी व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात येणार आहे. प्रभाग क्रमांक ५ मध्ये नगरसेविका मनिषा जामसंडेकर यांच्या माध्यमातून प्रबुद्धनगर येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण होणार आहे.
प्रभाग क्रमांक ६ मध्ये माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर आणि नगरसेविका तन्वी चांदोस्कर यांच्या सौजन्याने देवगड-जामसंडे शहरातील विविध जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना सुमारे ५०० दप्तरांचे वाटप करण्यात येणार आहे. प्रभाग क्रमांक ७ मध्ये नगरसेवक रोहन खेडेकर यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा मळई येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरित केले जाणार आहे.
स्वच्छता व आरोग्य सभापती नगरसेवक बुवा तारी आणि नगरसेवक संतोष तारी यांच्या वतीने शहरातील मच्छी विक्रेत्या महिलांना छत्री वाटप करण्यात येणार असून मच्छिमार बांधवांसाठी विमा संरक्षण पॉलिसी सुरू करण्याचाही उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच माजी नगराध्यक्षा प्रणाली माने यांच्या वतीने प्रभाग क्रमांक ९ मधील महिलांना छत्री वाटप करण्यात येणार आहे.
उपनगराध्यक्षा मिताली सावंत यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक १० मधील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद किल्ला शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. प्रभाग क्रमांक १४ मध्ये योगेश पाटकर यांच्या वतीने नागरिकांना छत्री वाटपाचा कार्यक्रम होणार आहे.
नगरसेविका आद्या गुमास्ते यांच्या पुढाकारातून ज्येष्ठ नागरिकांना वृक्षांचे वाटप तसेच वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. नगरसेवक गटनेते शरद ठुकरुल यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा भटवाडी, बेलवाडी तसेच अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना रेनकोट, शैक्षणिक साहित्य आणि खाऊचे वितरण करण्यात येणार आहे.
याशिवाय प्रभाग क्रमांक १७ मधील बूथ क्रमांक ७३ च्या वतीने जिल्हा परिषद शाळा तारामुंबरी येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या सर्व कार्यक्रमांना आमदार अजितराव गोगटे, ज्येष्ठ नेते बाळ खडपे, भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, मंडल अध्यक्ष राजा भुजबळ यांच्यासह पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक, शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपा शहराध्यक्ष वैभव करंगुटकर यांनी दिली.