उद्योजक नंदकुमार घाटे यांच्या हस्ते श्री हनुमान मंदिरात विधिवत पूजा; ग्रामस्थ व उत्कर्ष मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
देवगड,दि.२२ ऑगस्ट
सालाबादप्रमाणे देवगड किल्ला येथील श्री हनुमान मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या सप्तप्रहरांच्या श्री हरिनाम सप्ताहाला शनिवार, २२ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. उद्योजक नंदकुमार घाटे यांच्या हस्ते श्री हनुमानाची विधिवत पूजा करून हरिनाम सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला.
श्री हनुमान मंदिर परिसरात हरिनाम सप्ताहाच्या प्रारंभानिमित्त ग्रामस्थ तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ‘देवा मला अलीकडे, मला पलीकडे’, ‘बजरंगबली की जय’ अशा जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. सप्ताहाच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, पुढील काळातही मंदिर परिसरात हरिनामाचा गजर आणि भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळणार आहे.
या प्रारंभ सोहळ्यास ग्रामस्थ शिवराम निकम, गुरुनाथ वाडेकर, चंद्रकांत पाळेकर, महेश नेसवणकर, अशोक गोळवणकर, केदार तेली, अभय जाधव, रमेश कोयंडे, संजय हरम, विवेकानंद हरम, अनिकेत हरम, राजेश निकम यांच्यासह देवगड किल्ला येथील उत्कर्ष मंडळाचे बहुसंख्य पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
श्री हनुमान मंदिरातील या पारंपरिक हरिनाम सप्ताहामुळे देवगड किल्ला परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून, सप्ताहाच्या विविध कार्यक्रमांना भाविकांनी उपस्थित राहून सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
