उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पुढाकारातून डिजिटल स्टॅण्डीचे लोकार्पण; विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होणार असल्याचे आरटीओ निरीक्षक निलेश ठोंबरे यांचे प्रतिपादन.
देवगड,दि.१२ जुलै
“ डिजिटल स्टँडीमुळे अध्यापन प्रक्रियेला आधुनिकतेची जोड मिळून ज्ञानवृद्धीस चालना मिळेल “ असे प्रतिपादन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय ,सिंधुदुर्गचे आरटीओ निरीक्षक श्री.निलेशजी ठोंबरे यांनी केले.जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.विजय काळे साहेब यांच्या सौजन्याने एक डिजिटल स्टॅण्डी देणगी स्वरुपात उपलब्ध झाला.त्याच्या लोकार्पण समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
यावेळी विचारमंचावर संस्थाध्यक्ष अॅड. अजितराव गोगटे, साई-दिर्बा मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक श्री. महेश भडसाळे, सौ. मृणाली भडसाळे, श्री. अनिकेत भडसाळे, श्री. तस्लिम शेख तसेच मुख्याध्यापक श्री. सुनील जाधव उपस्थित होते.
यावेळी आरटीओ निरीक्षक श्री. निलेश ठोंबरे यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे पालन, सुरक्षित वाहनचालक बनण्याचे महत्त्व आणि अपघात टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात श्री. निलेश ठोंबरे म्हणाले की, “रस्ता अपघात हा केवळ नशिबाचा भाग नसून अनेकदा निष्काळजीपणाचा परिणाम असतो. प्रत्येक विद्यार्थ्याने वाहतूक नियमांची माहिती करून घेणे, सिग्नलचे पालन करणे, रस्ता ओलांडताना झेब्रा क्रॉसिंगचा वापर करणे, मोबाईलचा वापर टाळणे आणि दुचाकीवर हेल्मेट तसेच चारचाकीत सीटबेल्टचा वापर करणे ही स्वतःच्या सुरक्षेची पहिली पायरी आहे. अल्पवयीन मुलांनी कोणतेही वाहन चालवू नये. वेगावर नियंत्रण, संयम आणि शिस्त हीच सुरक्षित प्रवासाची गुरुकिल्ली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या कुटुंबात व समाजात वाहतूक सुरक्षेचा संदेश पोहोचवून जबाबदार नागरिक म्हणून योगदान द्यावे.” असे आवाहन केले.
याप्रसंगी बोलताना संस्थाध्यक्ष अॅड. अजितराव गोगटे यांनी सांगितले की, “आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक, सामाजिक, वैज्ञानिक तसेच विविध जनजागृतीपर संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी डिजिटल स्टँडी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील राहील.”
यावेळी मुख्याध्यापक श्री. सुनील जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात सांगितले की, “प्रशालेला डिजिटल स्टँडी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशालेचे माजी विद्यार्थी व साई-दिर्बा मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक श्री. महेश भडसाळे यांचे मोलाचे योगदान आहे. आपल्या मातृसंस्थेविषयी असलेला त्यांचा जिव्हाळा आणि सामाजिक बांधिलकी त्यांच्या या कृतीतून प्रकर्षाने दिसून येते. याबद्दल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मा. श्री. विजय काळे तसेच श्री. महेश भडसाळे यांचे संस्थेच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना वाहतुक सुरक्षे संदर्भात प्रश्न विचारून बरोबर उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांना वाहतुक सुरक्षेसंदर्भात पेन ड्राईव्ह देऊन विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते गौरवण्यात आले.
कार्यक्रमास सुमारे १०० विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थित विद्यार्थ्यांना श्री. महेश भडसाळे यांच्या वतीने स्वादिष्ट समोशांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन प्रशालेच्या शिक्षकांनी केले. श्री. संजय पांचाळ यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.