नगरसेवक विशाल मांजरेकर, तेजस मामघाडी यांचा विशेष सहकार्यातून पुढाकार; मुख्याधिकारी हरिदत्त माने यांनी केली पाहणी
देवगड,दि.११ सप्टेंबर
जामसंडे आझादनगर येथील लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या ॲनिमल पार्कची दयनीय अवस्था ‘सिंधुदुर्ग संवाद’ने वृत्ताच्या माध्यमातून प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर या वृत्ताची तातडीने दखल घेण्यात आली आहे. नगरसेवक विशाल मांजरेकर आणि तेजस मामघाडी यांनी पुढाकार घेत विशेष सहकार्यातून ॲनिमल पार्क परिसरातील वाढलेली झाडी-झुडपे हटविण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे झाडीत हरवलेल्या या पार्कमधील प्राणी-पक्ष्यांच्या प्रतिकृतींना पुन्हा मोकळे स्वरूप मिळत असून, त्यांच्या या पुढाकाराचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर देवगड-जामसंडे शहरातील विविध भागांमध्ये स्वच्छता आणि झाडी-झुडपे हटविण्याची कामे युद्धपातळीवर सुरू असताना जामसंडे आझादनगर येथील ॲनिमल पार्क मात्र दुर्लक्षित असल्याचे चित्र ‘सिंधुदुर्ग संवाद’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तातून समोर आणले होते. लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या पार्कची देखभाल होत नसल्याने पायवाटा झाडीत गडप झाल्या होत्या. या वृत्ताची दखल घेत नगरसेवक विशाल मांजरेकर आणि तेजस मामघाडी यांनी विलंब न करता प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली.
गुरुवारी सायंकाळी देवगड-जामसंडे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हरिदत्त माने यांनी आपल्या सहकाऱ्यांसह जामसंडे आझादनगर येथील ॲनिमल पार्कला भेट देऊन पाहणी केली. यावेळी पार्क परिसरात नगरसेवक विशाल मांजरेकर आणि तेजस मामघाडी यांच्या माध्यमातून वाढलेली झाडी-झुडपे हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे दिसून आले.
नगरसेवकांनी घेतलेल्या या तत्काळ पुढाकारामुळे पार्कमधील प्राणी-पक्ष्यांच्या प्रतिकृती तसेच पायवाटा झाडीमधून पुन्हा दिसू लागल्या आहेत. नागरिक आणि विशेषतः लहान मुलांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरू शकणाऱ्या या पार्कला स्वच्छ व सुस्थितीत आणण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी घेतलेला पुढाकार निश्चितच कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, ‘सिंधुदुर्ग संवाद’च्या वृत्तानंतर प्रशासनानेही या प्रकरणाची पाहणी केल्याने आता ॲनिमल पार्कच्या पुढील देखभालीबाबत आणि रखडलेल्या लोकार्पणाबाबत नगरपंचायत प्रशासन काय निर्णय घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.