देवगडमध्ये एस.एन.डी.टी. संलग्न महिला महाविद्यालयाला प्रथम मान्यता; १ ऑगस्टपासून प्रवेश प्रक्रिया सुरू

शेअर करा

बी.एस्सी. होम सायन्सच्या तीन अभ्यासक्रमांना मंजुरी; कोकण विभागातील पहिले एस.एन.डी.टी. संलग्न महिला महाविद्यालय ठरणार

देवगड,दि.१८ जुलै

जामसंडे येथील विद्या विकास मंडळ संचलित महिला महाविद्यालयाला एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाची शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून बी.एस्सी. होम सायन्स अभ्यासक्रमासाठी प्रथम संलग्नता (First Time Affiliation) प्राप्त झाली आहे. या अंतर्गत पोषणशास्त्र व आहारशास्त्र, संसाधन व्यवस्थापन व अंतर्गत सजावट तसेच वस्त्रशास्त्र व फॅशन डिझाईन या तीन अभ्यासक्रमांना मान्यता देण्यात आली असून, येत्या १ ऑगस्टपासून महाविद्यालय सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रारंभी १२० विद्यार्थिनींना प्रवेश देण्याचे उद्दिष्ट संस्थेने निश्चित केले आहे.

संस्थेचे अध्यक्ष अॅड. अजित गोगटे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्य शासनाने प्रत्येक तालुक्यात नवीन महाविद्यालयांना परवानगी देण्याची प्रक्रिया हाती घेतल्यानंतर देवगडसाठी हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. विविध समित्यांच्या पाहण्या, आवश्यक पूर्तता आणि विद्यापीठाच्या प्रक्रियेनंतर ३० जून रोजी शासनाची मान्यता मिळाली. त्यानंतर एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाकडून प्रथम संलग्नतेचे पत्र प्राप्त झाले.

महाविद्यालयासाठी प्रारंभी नीलकंठ दीक्षित यांनी ४० लाख रुपयांची देणगी दिली आहे. त्यांच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ महाविद्यालयाचे नामकरण ‘श्रीमती नीता नीलकंठ दीक्षित महिला महाविद्यालय’ असे करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

अॅड. गोगटे यांनी सांगितले की, कोकण विभागात बी.एस्सी. होम सायन्स अभ्यासक्रम सुरू करणारे हे पहिले एस.एन.डी.टी. संलग्न महिला महाविद्यालय ठरणार आहे. पोषणशास्त्र व आहारशास्त्र या शाखेसाठी विज्ञान शाखेतील बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनी पात्र असतील, तर संसाधन व्यवस्थापन व अंतर्गत सजावट तसेच वस्त्रशास्त्र व फॅशन डिझाईन या अभ्यासक्रमांसाठी कला, वाणिज्य, विज्ञान तसेच एमसीव्हीसी शाखेतील विद्यार्थिनींनाही प्रवेश घेता येणार आहे.

महाविद्यालयाची स्वतंत्र इमारत उभारण्याचे काम सुरू असून ते लवकरच पूर्ण होणार आहे. आवश्यक प्राध्यापक व कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया सुरू असून विद्यार्थिनींना दर्जेदार शिक्षणासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेला संस्थेचे अध्यक्ष अॅड. अजित गोगटे, अॅड. अभिषेक गोगटे, नव्या महाविद्यालयाचे प्राचार्य विमल बलवान, डी.बी. बलवान विद्यालयाचे मुख्याध्यापक जाधव सर, माजी मुख्याध्यापक अ. प. सोमण, संस्थेचे पदाधिकारी प्रवीण जोग, संतोष कुलकर्णी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

शेअर करा