देवगड : घरगुती वादातून वडिलांना लाकडी दांड्याने मारहाण; मुलाविरुद्ध गुन्हा

शेअर करा

मिठबाव आडारीवाडीतील घटना; शिवीगाळ व मारहाणीत वडिलांना दुखापत, देवगड पोलिसांत तक्रार दाखल

देवगड,दि.२८ सप्टेंबर
घरगुती वादाचा राग मनात धरून वडिलांना शिवीगाळ करून व त्यांना लाकडी दांड्याने मारहाण करून दुखापत केल्याप्रकरणी मिठबाव आडारीवाडी येथील संशयित चिन्मय परशुराम लोके (वय २७) याच्याविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २८ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिठबाव आडारीवाडी येथील परशुराम पांडुरंग लोके (वय ६७) यांचे स्वमालकीचे घर आहे. या घरात ते पत्नी व मुलगा चिन्मय याच्यासमवेत ‘अ’ व ‘ब’ विभागात विभक्त राहतात. त्यांच्यात घरगुती कारणावरून वाद आहेत. सोमवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास परशुराम लोके हे देवपूजाकरिता त्यांच्या मालकीच्या बागेतील फुले काढत असताना तेथे आलेल्या चिन्मयने ‘फुले काढायची नाही’, असे सांगितले. यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी संशयित चिन्मयने घरगुती राग मनात धरून वडिल परशुराम लोके यांच्या दोन्ही पायांच्या गुडघ्यावर लाकडी दांड्याने मारून दुखापत केली. तसेच त्यांना शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. परशुराम लोके यांच्या दैनंदिन कामासाठी असलेली मजूर महिला श्रीमती शिवानी शिवाजी चव्हाण (५०) यांनाही संशयित चिन्मयने शिवीगाळ करून त्यांच्यावर खोटेनाटे आरोप केले. याबाबतची फिर्याद परशुराम लोके यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली असून या फिर्यादीनुसार संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८ (१), ३५१ (२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार गणपती गावडे करीत आहेत.

शेअर करा