सभापती गणेश राणे यांचे पंचायत समिती व कृषी विभागाला सक्त आदेश; संयुक्त पाहणी करण्याच्या सूचना
देवगड,दि.२३ सप्टेंबर
भात शेती पावसा अभावी करपत असून याबाबत पंचायत समितीच्या व तालुका कृषी विभागाने संयुक्तपणे पाहणी करून चार दिवसात वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा. त्याचप्रमाणे कृषि विभागाने आंबा काजू नुकसान भरपाई बाबत माहिती तातडीने सादर करावी. असे सक्त आदेश सभापती गणेश राणे यांनी आज आढावा बैठकीत दिलेत.
देवगड पंचायत समितीची मासिक बैठक आज सभापती गणेश राणे यांचे अध्यक्षते खाली पार पडली. यावेळी व्यासपीठावर उपसभापती अमोल लोके, गटविकास अधिकारी निलेश जगताप उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत रविंद्र तिर्लोटकर सदाशिव ओगले यांनी भात शेती पावसा अभावी वाया जात आहे, संपूर्ण राज्यामध्ये पाऊस नसल्याने दिवसे दिवस शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. आंबा व काजू पिकाबाबत नुकसान भरपाई जाहीर होऊनही केवळ देवगड तालुक्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली नाही. ती का असा सवाल यावेळी केला.मात्र तालुका कृषी विभागाने नेहमी प्रमाणे केवायसी चा सबब पुढे करून चर्चेला पूर्ण विराम दिला. अखेर सभापती गणेश राणे यांनी गेला महिनाभर पाऊस नसल्याने भात पिकाच्या नुकसानी बाबत तक्रारी येत आहेत. कोणत्याही आदेशाची वाट न पाहता पंचायत समितीच्या व तालुका कृषी विभागाने त्या त्या भागातील कृषी सहाय्यक समवेत पाहणी करून पंचयाद्या करून वस्तुनिष्ठ अहवाल चार दिवसात द्यावा. त्याचप्रमाणे आंबा व काजू नुकसान भरपाई किती जणांना प्राप्त झाली. किती जणांना खात्यावर रक्कम अदा झाली याशिवाय केवायसी न झालेली आकडेवारी तातडीने द्यावी असे सक्त आदेश यावेळी दिलेत. त्याचप्रमाणे कोटकामते किंजवडे या भागातील शेतकऱ्यांना फार्मर आयडी ची समस्या असल्याचे सांगण्यात आले.
ग्रामपंचायत अफहार प्रकरणी ३४ ग्रामपंचायतीवर ठपका ठेवण्यात आला आहे असे सांगून रविंद्र तिर्लोटकर यांनी मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यात आले आहेत त्यामुळे विकास कामावर परिणाम होत असल्याचे सांगितले.यावेळी २३ ग्रामपंचायतीवर प्रशासक असल्याचे सांगण्यात येऊन जे अधिकारी नेमण्यात आले आहेत त्यांच्यावर स्वतःचा विभागाचा व अतिरिक्त प्रशासक पदभार सांभाळावा लागतो आहे. ही गंभीर बाब असून १५ व्या वित्त आयोगाची रक्कम वाया जाऊ नये यादृष्टीने अधिकाऱ्यांनी सतर्कपणे कामकाज करावे.अशी सूचना उपसभापती अमोल लोके यांनी केली.बांधकाम विभागाकडे तीन कनिष्ठ अभियंता कार्यरत असून एकही अंदाजपत्रक शिल्लक राहणार नाहीत त्यादृष्टीने शाखा अभियंता यांनी आजपासून नियोजन करावे अशा सूचना सभापती यांनी दिल्या.
देवगड तालुक्यात दूध संकलनाची आकडेवारी पाहता पोषण आहारात प्रत्येक विद्यार्थाला २०० मिली दूध देण्यासाठी आपला प्रयत्न असून संपूर्ण तालुक्यात ही योजना राबविण्यात हा तालुका अग्रेसर राहील.असे सांगून सभापती गणेश राणे यांनी पशुसंवर्धन विभागाला पूर्ण तालुक्यात किती दूध संकलित केले जाईल.तसेच अंगणवाडी विद्यार्थी संख्या या बाबत माहिती देण्याची सूचना दिली.तालुक्यात गुरांसाठी कोंडवाडा व गायरान साठी दाभोळे ,किंजवडे, बापर्डे या ग्रामपंचायतीने सहमती दिली असून त्यासाठी जागा देखील देण्याची तयारी असल्याचे सांगण्यात आले.
चतुर्थी पुर्वी एस टी आगाराला सूचना करूनही विजयदुर्ग आगाराने नियोजन केले नाही याकडे रविंद्र तिर्लोटकर यांनी लक्ष वेधून विजयदुर्ग आगरामार्फत विरार,चिपळूण,सावंतवाडी या मार्गावर गाड्यांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.सार्वजनिक बांधकाम विभागाने देखील दाभोळे, दहीबाव ,नारिंगे ,मशवी या मार्गावरील झाडी व खड्डे बुजविण्याचे काम झाले नाही याबाबत सदाशिव ओगले यांनी नाराजी व्यक्त केली.तळवडे येथे बी एस एन एल चा टॉवर उभारण्यासाठी पंचायत समितीच्या नावे असलेली २ गुंठे जागा उपलब्ध करून दिल्यास त्याभागातील चार गावांना नेटवर्क प्राप्त होईल.याकडे समृद्धी चव्हाण यांनी लेखी मागणी केली.याबाबत जागा देण्याचा ठराव यावेळी घेण्यात आला. गटविकास अधिकारी निलेश जगताप यांनी दि १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या दरम्यान तालुक्यात सर्व ग्रामपंचायती मध्ये सेवा संकल्प अभियान सुरू असून एकूण २६ कार्यक्रम पार पडणार आहेत.तसेच २ ऑक्टोबर रोजी तालुक्याची ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.