देवगड,दि.२९ सप्टेंबर
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ मंगल कार्यालय, कणकवली येथे आयोजित करण्यात आलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत शेठ म. ग. हायस्कूल, देवगडच्या विद्यार्थिनीने उल्लेखनीय कामगिरी करत यश संपादन केले.
प्रशालेतील १७ वर्षांखालील गटातील कु. स्वराली संदीप मिराशी हिने आपल्या उत्कृष्ट बुद्धिबळ कौशल्याचे प्रदर्शन करत दमदार कामगिरी केली. तिची सांगली येथे होणाऱ्या विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिच्या या निवडीमुळे प्रशालेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
स्वरालीने बुद्धिबळाच्या पटावर दाखवलेली एकाग्रता, संयम, अचूक नियोजन आणि डावपेचांची प्रभावी अंमलबजावणी यामुळे तिने हे यश संपादन केले. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रशालेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या यशाबद्दल शाळा समिती अध्यक्ष चंद्रकांत शिंगाडे, संस्थापदाधिकारी ,प्रशालेचे मुख्याध्यापक प्रविण खडपकर, पर्यवेक्षिका सौ. निशा दहिबावकर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पालकवर्ग यांनी स्वरालीचे अभिनंदन करून सांगली येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी तिला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.