देवगड : ‘विठ्ठल… रखुमाई’च्या जयघोषात तारामुंबरीतून पंढरपूर पायी वारीला उत्साहात प्रारंभ

शेअर करा

ह.भ.प. नामदेव महाराज तळवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली दुसऱ्या वर्षीही भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो वारकरी झाले सहभागी

देवगड, दि. ०८ जुलै

“विठ्ठल… विठ्ठल… जय हरी विठ्ठल…!” या अखंड नामघोषाने देवगड तालुक्यातील तारामुंबरी परिसर रविवारी भक्तिरसात न्हाऊन निघाला. श्रीक्षेत्र तारामुंबरी येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर देवस्थानाच्या वतीने आणि ह.भ.प. नामदेव महाराज तळवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या तारामुंबरी ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायी वारी पालखी सोहळ्याला उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला.

टाळ-मृदंगाचा निनाद, भगव्या पताकांची दिमाखदार शोभा आणि विठ्ठल-रखुमाईच्या अखंड जयघोषामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. शेकडो वारकरी आणि भाविकांच्या उपस्थितीमुळे जणू काही तारामुंबरीतच प्रति पंढरपूर अवतरल्याचा अनुभव प्रत्येकाला येत होता. देवगड तालुक्यासह परिसरातील नागरिकांनी मोठ्या श्रद्धेने या पायी वारीत सहभाग घेतला.

या वारीचे चालू मानकरी दिनेश कांदळगावकर, सत्यवान हरम, अध्यक्ष सूर्यकांत जोशी, दिंडी अध्यक्ष ह.भ.प. नामदेव महाराज तळवडकर, तसेच देविदास परब, मिलिंद कुबल, ज्ञानेश्वर खवळे, शिवाजी कांदळगावकर, बापू जुवाडकर, हेमंत चोपडेकर, संदीप कांदळगावकर, विलास नावगे यांच्यासह महिला भाविकही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

वारीला प्रारंभ होण्यापूर्वी उद्योजक नंदकुमार घाटे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रखुमाईंची विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते बाळ खडपे, नगरसेविका प्रणाली माने, नगरसेवक विशाल मांजरेकर, शहराध्यक्ष दयानंद पाटील, संजय तारकर, वैभव करगुटकर, विकास कोयंडे तसेच तारामुंबरी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यंदा या पायी वारीचे दुसरे वर्ष असून पहिल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी वारकरी आणि भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. दरवर्षी वाढत असलेल्या सहभागामुळे देवगड तालुक्यात भक्तीची परंपरा अधिक बळकट होत असून तारामुंबरीला ‘प्रति पंढरपूर’चे स्वरूप प्राप्त होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या या पालखीचे विविध ठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. या पायी वारीच्या आयोजनासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी मोलाची मदत केल्याचे ग्रामस्थ मिलिंद कुबल यांनी यावेळी सांगितले.

शेअर करा