देवगड : भाविकांसाठी देवगड आगाराची तीर्थस्थळ बस सेवा सुरू; विविध धार्मिक स्थळांसाठी विशेष सुविधा

शेअर करा

महिला, ज्येष्ठ नागरिक व ७५ वर्षांवरील प्रवाशांना सवलत; समूह प्रवासासाठीही विशेष व्यवस्था

देवगड,दि.१३ ऑगस्ट

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) देवगड आगारामार्फत भाविकांसाठी विविध तीर्थक्षेत्रांच्या दर्शनासाठी विशेष बस सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सुरक्षित, आरामदायी आणि नियोजनबद्ध प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देत भाविकांचा प्रवास अधिक सुलभ करण्याचा या उपक्रमामागील उद्देश आहे.

या विशेष तीर्थस्थळ फेरीमध्ये गणपतीपुळे, मारलेश्वर कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिर, तुळजापूर, पंढरपूर तसेच अक्कलकोट या प्रमुख धार्मिक स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. या माध्यमातून भाविकांना एकाच नियोजनात विविध तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची संधी मिळणार आहे.

या सेवेसाठी आरामदायी बस, अनुभवी व प्रशिक्षित चालक, सुरक्षित आणि वेळेवर सेवा तसेच वाजवी दरात प्रवासाची सुविधा उपलब्ध राहणार आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ७५ वर्षांवरील प्रवाशांना नियमानुसार तिकीट सवलतीचाही लाभ मिळणार असल्याचे आगार प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
याशिवाय, एखाद्या गावातून ४० किंवा त्यापेक्षा अधिक प्रवाशांचा समूह तयार झाल्यास त्या गावातूनच विशेष बसची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे समूहाने तीर्थयात्रा करणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या तीर्थस्थळ बस सेवेबाबत अधिक माहिती तसेच नोंदणीसाठी इच्छुकांनी देवगड एसटी आगाराशी संपर्क साधावा, असे आवाहन आगार व्यवस्थापक सौरभ औंधकर यांनी केले आहे.

शेअर करा