देवगड : बेकायदेशीर मच्छीमारीविरोधात पारंपरिक मच्छीमार आक्रमक; कठोर कारवाईची मागणी

शेअर करा

परवाना अधिकारी किरण वाघमारे यांना निवेदन; कारवाई न झाल्यास कायदा हातात घेण्याची वेळ येईल, असा इशारा

देवगड,दि ०८ सप्टेंबर

देवगड परिसरातील पारंपरिक मच्छीमारांच्या हक्कांचे संरक्षण तसेच पारंपरिक रापण व्यवसायाला भेडसावणाऱ्या समस्यांबाबत पारंपरिक बिगर यांत्रिकी रापण संघ, देवगड यांच्या वतीने परवाना अधिकारी किरण वाघमारे यांना निवेदन देण्यात आले.

देवगड परिसरातील पारंपरिक मच्छीमार गेल्या अनेक वर्षांपासून रापण पद्धतीने मासेमारी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. या व्यवसायावर अनेक मच्छीमार कुटुंबांसह स्थानिक कामगारांचेही जीवन अवलंबून आहे. मात्र, सध्या विजयदुर्ग ते मुणगे हद्दीत मिनी पर्ससीन नेट तसेच पर्ससीन नेटच्या माध्यमातून होणाऱ्या मासेमारीमुळे पारंपरिक रापण मच्छीमारी व्यवसायावर विपरीत परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या या मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमारांच्या जाळ्यात येणाऱ्या माशांचे प्रमाण कमी झाले असून, त्याचा थेट परिणाम त्यांच्या व्यवसायावर होत आहे. त्यामुळे संबंधित हद्दीत नियमबाह्य अथवा प्रतिबंधित पद्धतीने होणाऱ्या मिनी पर्ससीन नेट व पर्ससीन नेट मासेमारीची तात्काळ पाहणी करून संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी संघाच्या वतीने करण्यात आली.

तसेच रापण संघाच्या हद्दीत नियमित गस्त व तपासणी करून पारंपरिक मच्छीमारांच्या हिताचे संरक्षण करावे, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी पारंपरिक मच्छीमारांनी, बेकायदेशीर मासेमारीवर तातडीने कारवाई न झाल्यास कायदा हातात घेण्याची वेळ येईल, असा इशारा प्रशासनाला दिला.

दरम्यान, परवाना अधिकारी किरण वाघमारे यांनी पारंपरिक मच्छीमारांच्या मागण्यांची दखल घेत, त्यांच्या हद्दीत कोणत्याही प्रकारे बेकायदेशीर मासेमारी होऊ नये यासाठी विभागाकडून आवश्यक ती कार्यवाही व नियमित तपासणी केली जाईल, असे आश्वासन दिले.

यावेळी विश्वास भुजबळ, दिनेश धुवाळी, संतोष लब्दे, प्रशांत शिंदे, लक्ष्मण जोईल, अशोक पेडणेकर, शशिकांत लब्दे, अनिल जोईल यांच्यासह रापण संघाचे पदाधिकारी व पारंपरिक मच्छीमार बांधव उपस्थित होते.

शेअर करा