गणेशोत्सवाच्या दोन दिवस आधीच वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रशासनाच्या नियोजनावर नागरिकांची नाराजी
देवगड,दि.११ सप्टेंबर
गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना देवगड-जामसंडे नगरपंचायत आणि पोलीस प्रशासनाने आठवडी बाजारातील संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी केलेल्या नियोजनाला यश मिळाले. मात्र, दुसरीकडे जामसंडे बाजारपेठ तसेच देवगड बाजारपेठेकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिक आणि चाकरमान्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शुक्रवारी आठवडी बाजाराच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायत प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने सकाळपासूनच बाजार परिसरात तैनात राहून वाहनांच्या वाहतुकीचे नियोजन केले. वाहनांना ठराविक मार्ग देणे, वाहतूक सुरळीत ठेवणे तसेच वाहनचालकांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्याने आठवडी बाजार परिसरातील वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आले.
मात्र, जामसंडे बाजारपेठ तसेच देवगड बाजारपेठेकडे जाणाऱ्या रस्त्यावर परिस्थिती याच्या अगदी उलट पाहायला मिळाली. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होऊन वाहतूक कोंडी निर्माण झाली. विशेष म्हणजे या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी नगरपंचायत कर्मचारी किंवा देवगड पोलीस ठाण्याचे कर्मचारी तैनात नसल्याने वाहतूक कोंडीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यात प्रशासनाला अडचणी येत असल्याचे चित्र दिसून आले.
गणेशोत्सवासाठी मुंबई, पुणे तसेच इतर शहरांमधून मोठ्या संख्येने चाकरमानी गावाकडे दाखल होत आहेत. त्यामुळे आगामी दोन दिवसांत देवगड-जामसंडे शहरातील वाहनांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या जामसंडे बाजारपेठ आणि देवगड बाजारपेठेकडे जाणाऱ्या मार्गावरच वाहतूक कोंडी होत असल्याने गणेशोत्सवाच्या काळात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
आठवडी बाजारातील वाहतूक कोंडीवर प्रशासनाने केलेले नियोजन कौतुकास्पद असले तरी शहरातील इतर प्रमुख मार्गांवरही त्याच पद्धतीने वाहतूक नियोजन करण्याची गरज आहे. बाजारपेठेकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पोलीस कर्मचारी तसेच नगरपंचायतीचे कर्मचारी तैनात करून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी नागरिक आणि चाकरमान्यांकडून करण्यात येत आहे.
गणेशोत्सवाच्या काळात देवगड-जामसंडे शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने आता नगरपंचायत प्रशासन आणि पोलीस प्रशासन या वाहतूक कोंडीवर कोणत्या पद्धतीने तोडगा काढते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. अन्यथा गणेश चतुर्थीच्या काळात जामसंडे बाजारपेठ तसेच देवगड बाजारपेठेकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.