५०४ ग्रॅम गांजा व २.२६ ग्रॅम पांढऱ्या रंगाची संशयित पावडर जप्त
सिद्धेश उर्फ भाई परब याला अटक
वेंगुर्ला,दि.११ सप्टेंबर
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याविरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली असून, आज (११ सप्टेंबर) शिरोडा येथे करण्यात आलेल्या कारवाईने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिरोडा येथील शिवसेना (शिंदेगट) उपजिल्हाप्रमुख तथा वेंगुर्ला पंचायत समितीचे माजी उपसभापती सिद्धेश उर्फ भाई परब यांच्या घरावर वेंगुर्ला पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकला. या कारवाईत त्यांच्या घरातील टेबलाखाली ठेवलेल्या बॅगेतून १५ हजार रुपये किमतीचा ५०४ ग्रॅम गांजा आणि ३३ हजार रुपये किंमतीची २.२६ ग्रॅम वजनाची पांढऱ्या रंगाची मेथामफेटामाईन पावडर असा एकूण सुमारे ४७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी सिद्धेश परब यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी ‘नशामुक्त सिंधुदुर्ग’ अभियान हाती घेतले असून, जिल्ह्यातील अंमली पदार्थांची विक्री, साठवणूक व तस्करी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जिल्ह्यातील अवैध अमली पदार्थांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले आहे.
शिरोडा येथे सिद्धेश परब यांच्या घरात अंमली पदार्थांचा साठा असल्याची गोपनीय माहिती वेंगुर्ला पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून पोलिस पथकाने आज सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास परब यांच्या घरावर छापा टाकला. घराची झाडाझडती घेत असताना टेबलाखाली ठेवलेल्या एका बॅगेची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १५ हजार रुपये किमतीचा ५०४ ग्रॅम गांजा तसेच ३३ हजार रुपये किमतीची २.२६ ग्रॅम वजनाची पांढऱ्या रंगाची मेथामफेटामाईन पावडर आढळून आली. पोलिसांनी दोन्ही पदार्थ जप्त केले असून, एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे ४७ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या कारवाईदरम्यान पदार्थांची तपासणी व नमुने घेण्यासाठी ओरोस येथील फॉरेन्सिक पथकाला शिरोडा येथे पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी कारवाईदरम्यान सिद्धेश परब यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. हा अमली पदार्थांचा साठा घरात कशासाठी ठेवण्यात आला होता, त्याचा पुरवठा कोणी केला, त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच या प्रकरणाचे कोणते मोठे रॅकेट आहे का, याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे.
ही कारवाई सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहिकर व अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वेंगुर्ला पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निसर्ग कोतारी यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकातील स्वप्निल तांबे, मंगेश कदम, दीपा मठकर, जयेश सरमळकर, मनोज परुळेकर, प्रथमेश पालकर, श्री घाडगे, गुरव आणि योगेश मांजरेकर यांनी कारवाई केली.
अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या या धडक मोहिमेमुळे जिल्ह्यातील अमली पदार्थ विक्रेते व तस्करांचे धाबे दणाणले असून, शिरोड्यातील या कारवाईमुळे जिल्ह्यातील अमली पदार्थांच्या नेटवर्कचा तपास आणखी व्यापक होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी करत आहेत
चौकट: सिद्धेश उर्फ भाई परब यांनी २०२५ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षातून शिंदे शिवसेनेत प्रवेश केला होता. हल्लीच त्यांना शिवसेना उपजिल्हाप्रमुख हे पद देण्यात आले होते. तसेच त्यांची पत्नी योगिता परब या वेंगुर्ला पंचायत समितीच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.