​सावंतवाडी:शिरोडा येथील अंमली पदार्थ प्रकरण: कार्यकर्त्यांनी सतर्क राहून सीसीटीव्ही लावावेत!

शेअर करा

ठाकरे शिवसेना जिल्हा प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांचे आवाहन

सावंतवाडी,दि.११ सप्टेंबर
गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, शिरोडा येथील माजी पंचायत समिती उपसभापती सिद्धेश परब यांच्या घराच्या आवारातील मांगरात पोलिसांनी टाकलेल्या धाडीत गांजा आणि कोकेनसदृश अंमली पदार्थ सापडले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला असून, हा प्रकार अत्यंत संशयास्पद असल्याचा दावा ठाकरे शिवसेना जिल्हा प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केला आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, एका टिपच्या आधारे पोलीस पथकाने आज सकाळी सिद्धेश परब यांच्या घरी पोहोचून संपूर्ण घराची तसेच आवारातील २-३ मांगरांची झडती घेतली. मात्र, सुरुवातीला पोलिसांना काहीही संशयास्पद आढळले नाही. त्यानंतर झालेल्या काही फोन कॉल्सच्या संवादानंतर पोलिसांनी एका मांगरातील टेबलखालील संशयास्पद बॅग हस्तगत केली. त्यामध्ये ५०४ ग्रॅम गांजा आणि सिगारेटच्या पाकिटात कोकेनसदृश पावडर मिळून आली.
​डॉ. परुळेकर यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, सिद्धेश परब हे सातत्याने सामाजिक कार्यासाठी, मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आणि आजगावसह आठ गावांवर लादल्या जाणाऱ्या मायनिंगविरोधात सक्रिय लढा देत आहेत. अशा व्यक्तीच्या घरात अंमली पदार्थ मिळणे ही गोष्ट अविश्वसनीय आहे. जिल्ह्यामध्ये शाळा-कॉलेजांच्या परिसरात अंमली पदार्थांचा विळखा वाढला असला, तरी त्याचा साठा मायनिंगविरोधात लढा देणाऱ्या कार्यकर्त्याच्याच मांगरात मिळणे ही बाब अनेक शंका-कुशंका निर्माण करणारी आहे.
​या घटनेच्या पार्श्वभूमीवर, शक्तीपीठ महामार्ग, आजगाव मायनिंग किंवा इको-सेन्सिटिव्ह झोनविरोधात लढा देणाऱ्या सर्व सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांनी अत्यंत सतर्क राहण्याची गरज आहे. सर्वांनी आपापली घरे, आवारे आणि मांगरांची सतत तपासणी करावी, तसेच शक्य असणाऱ्यांनी आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत, असे आवाहन डॉ. परुळेकर यांनी केले आहे. या प्रकरणात न्यायालय योग्य तो न्याय देईल, असा विश्वासही त्यांनी शेवटी व्यक्त केला.

शेअर करा