खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या ३५ वर्षीय चेतन परब यांचा मोठ्या लाटांमध्ये तोल जाऊन मृत्यू; परिसरात शोककळा
देवगड,दि.०६ ऑगस्ट
कुणकेश्वर येथील खालचीवाडी परिसरातील रहिवासी चेतन मोहन परब (वय ३५) यांचा समुद्रात वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. बुधवारी रात्री उशिरा ही घटना घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चेतन परब हे आपल्या काही मित्रांसोबत कुणकेश्वर–मिठमुंबरी मार्गालगतच्या समुद्रकिनारी खेकडे पकडण्यासाठी गेले होते. यावेळी समुद्रकिनाऱ्यावर त्यांचा अचानक तोल जाऊन ते पाण्यात पडले. त्या वेळी समुद्रात मोठ्या लाटा असल्याने ते पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे कुणकेश्वर परिसरात शोककळा पसरली आहे. चेतन परब यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि एक लहान मुलगा असा परिवार आहे.