देवगड : कुणकेश्वरमध्ये ‘ट्री ऑफ लाईफ’ ताज हॉटेलची घोषणा; देवगडमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांचा जल्लोष

शेअर करा

५० खोल्यांचे पंचतारांकित हॉटेल २४ महिन्यांत उभारण्याचे नियोजन; पर्यटन आणि रोजगाराला चालना मिळण्याची अपेक्षा

देवगड,दि.२२ सप्टेंबर

कोकणच्या निसर्गसौंदर्याला जागतिक दर्जाच्या पर्यटन सुविधांची जोड देण्याच्या दिशेने सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे. देवगड तालुक्यातील प्रसिद्ध कुणकेश्वर येथे ‘ट्री ऑफ लाईफ’ या ताज हॉटेल्स ब्रँडच्या पंचतारांकित हॉटेलची उभारणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची घोषणा झाल्यानंतर देवगडमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांकडून फटाके वाजवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

कुणकेश्वर येथे ५० खोल्यांचे आलिशान हॉटेल उभारण्यात येणार असून, हा प्रकल्प २४ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या संदर्भातील करार मंत्रालयात मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत ‘स्टार्टर बिल हॉस्पिटॅलिटी प्रा. लि.’ आणि ‘राजस्केप हॉटेल्स प्रा. लि.’ यांच्यात करण्यात आला.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, ताज ग्रुपचे तन्वीर जाहीदी, दत्तात्रय हिरे, रोहन रानडे, डॉ. निलेश बानवलीकर, ॲड. श्रीपाद महाजन आदी उपस्थित होते.

कुणकेश्वर हे धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध असून, या भागात आता जागतिक दर्जाच्या आतिथ्य सुविधांची भर पडणार आहे. या प्रकल्पामुळे देवगडसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हॉटेल, वाहतूक, स्थानिक खाद्यपदार्थ, हस्तकला तसेच विविध सेवा व्यवसायांना यामुळे नव्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

या प्रकल्पामुळे स्थानिक तरुण-तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. सिंधुदुर्गला पर्यटनाच्या माध्यमातून विकासाची नवी दिशा देत जिल्ह्याला पर्यटनाच्या उंच शिखरावर नेण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, कुणकेश्वर येथे ताज हॉटेल्स ब्रँडचा प्रकल्प येणार असल्याची घोषणा होताच देवगडमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी फटाके वाजवत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी माजी आमदार अजित गोगटे, भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, ज्येष्ठ नेते बाळ खडपे, नगरसेवक शरद ठुकरूल, रोहन खेडेकर, माजी नगरसेवक उमेश कनेरकर, योगेश चांदोसकर, ज्ञानेश्वर खवळे, गणपत गावकर, शहराध्यक्ष वैभव करगुटकर, व्ही.सी. खडपकर, महिला तालुकाध्यक्ष उषःकला केळुसकर, तन्वी चांदोसकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष दयानंद पाटील, नरेश डामरी आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर करा