देवगड आगाराचे चालक पंकज राजम यांनी एसटी बसमध्ये साकारली गणरायाची आकर्षक आरास
देवगड,दि.२१ सप्टेंबर
एसटी बस आणि बसचालक यांचे सेवाकाळात एक अतूट नाते निर्माण झालेले असते. याच सेवाभावातून देवगड आगाराचे चालक पंकज राजम यांनी आपल्या निवासस्थानी विराजमान गणरायाची एसटी बसमध्ये आकर्षक आरास करून गणेशोत्सवाच्या माध्यमातून एसटी सेवेप्रती असलेली आपुलकी, निष्ठा आणि प्रेम व्यक्त केले आहे.
यावर्षीच्या गणेशोत्सवातील आरासांमध्ये विविधता पाहायला मिळत असून, देवगड तालुक्यात घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवातील आरास लक्ष वेधून घेत आहेत. त्यामध्ये देवगड मळई येथील निवासस्थानी देवगड आगाराचे चालक पंकज राजम यांनी साकारलेली एसटीच्या प्रतिकृतीतील गणरायाची आरास विशेष आकर्षण ठरत आहे.
एसटी बसची सेवा ही केवळ प्रवासाचे साधन नसून चालक आणि प्रवाशांमध्ये जिव्हाळ्याचे नाते निर्माण करणारी सेवा आहे. आपल्या एसटी सेवेप्रती असलेली आपुलकी, निष्ठा आणि प्रेम पंकज राजम यांनी गणरायाच्या आरासीतून व्यक्त केले आहे. त्यांच्या या अनोख्या संकल्पनेची परिसरात चर्चा होत आहे.