देवगड : वाडातर पुलावरील झाडी तोडण्याच्या कामाला सुरुवात

शेअर करा

दोन वर्षांपासून प्रलंबित कामाला मुहूर्त; स्थानिक ग्रामस्थांसह वाहनचालकांना दिलासा

देवगड,दि.१० ऑगस्ट :

महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली देवगड-जामसंडे नगरपंचायत हद्दीतील वाडातर ब्रिजच्या पिचिंगवरील झाडी तोडण्याच्या कामाला अखेर प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. या कामामुळे स्थानिक नागरिक, पर्यटक तसेच वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

वाडातर पुलावरील पिचिंग परिसरात गेल्या दोन वर्षांपासून झाडी तोडण्याचे काम झाले नव्हते. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात झाडी वाढली होती. परिणामी स्थानिक नागरिक व पर्यटकांना तसेच वाहनचालकांना हिंस्र प्राण्यांचा त्रास होण्याची भीती निर्माण झाली होती. त्याचबरोबर पुलावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.

या समस्यांकडे लक्ष वेधत भाजपचे देवगड शहराध्यक्ष वैभव करंगुटकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करून पत्रव्यवहार केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून आजपासून झाडी तोडण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.

कामाला सुरुवात झाल्याने परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. मोरसकर यांचे सहकार्य लाभल्याबद्दल वैभव करंगुटकर यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

शेअर करा