असलदे येथे पाच दिवसांच्या गणपतीचे भक्तिमय वातावरणात विसर्जन;‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या…’च्या जयघोषात
कणकवली,दि.१८ सप्टेंबर
असलदे गावात पाच दिवसांच्या गणपती उत्सवाची सांगता शुक्रवारी भक्तिमय वातावरणात झाली. पाच दिवस मनोभावे पूजा-अर्चा, आरती, भजन, प्रसाद व विविध धार्मिक कार्यक्रमांनी गजबजलेल्या घराघरांत सायंकाळी गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या…’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.गणेश भक्तांनी जड अंतःकरणाने बाप्पाला गणेश भक्तांनी निरोप देत पुढच्या वर्षी लवकर या..अशी प्रार्थना केली.

असलदे गावातील उगवतीवाडी, मधलीवाडी, डामरेवाडी,गावठणवाडी,तावडेवाडी,धनगरवाडी यासह गावातील सर्वच वाडीवर पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन गणेशकोंड,विसर्जन तळी,नदी मध्ये करण्यात आले.
पाच दिवसांच्या मुक्कामानंतर लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी गणेश भक्तांनी पारंपरिक पद्धतीने मिरवणुका काढल्या. ढोल-ताशांचा गजर, टाळ-मृदंगाचा निनाद आणि गणपती बाप्पाच्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले होते. महिला, पुरुष, युवक तसेच लहान मुलांनी मोठ्या उत्साहाने विसर्जन सोहळ्यात सहभाग घेतला.बापाच्या मूर्तींचे विसर्जनापूर्वी गणेश मूर्तीची विधिवत पूजा व आरती करण्यात आली. त्यानंतर फुलांनी सजविलेल्या वाहनातून किंवा पारंपरिक पद्धतीने गणेशमूर्ती विसर्जनस्थळी नेण्यात आल्या. यावेळी भक्तांनी ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘मंगलमूर्ती मोरया’, ‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

गेल्या पाच दिवसांत गणेश भक्तांनी बाप्पाची मनोभावे सेवा केली. घराघरांत सकाळ-संध्याकाळ आरती, नैवेद्य आणि प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे असलदे गावातील वातावरणात उत्साह आणि भक्तीचा संगम पाहायला मिळाला. पाच दिवसांचा उत्सव संपत असल्याने अनेक गणेश भक्तांच्या डोळ्यांत बाप्पाला निरोप देताना आनंदाअश्रू तरळले.
‘बाप्पा, आमच्या कुटुंबावर आणि गावावर सदैव कृपादृष्टी ठेवावी. सर्वांना सुख, समृद्धी, आरोग्य लाभावे आणि पुढील वर्षी पुन्हा मोठ्या उत्साहात आपल्या घरी आगमन व्हावे,’ अशी भावपूर्ण प्रार्थना गणेश भक्तांनी केली.
विसर्जन सोहळा शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. गणेशोत्सवामुळे निर्माण झालेली भक्ती, एकोपा आणि आनंदाची भावना पुढील वर्षभर कायम राहावी, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.