सिंधुदुर्ग,दि.०६ ऑगस्ट
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर अनुभवी व कार्यक्षम अधिकारी अनिरुद्ध देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीस रिझर्व बँकेने अधिकृत मान्यता दिली असून त्यांनी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे. राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
प्रशासकीय अनुभवाची शिदोरी
अनिरुद्ध देसाई हे सहकार व बँकिंग क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असलेले अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी सिंधुदुर्ग व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अत्यंत यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली आहे. पुणे जिल्हा बँकेत त्यांच्या कार्यकाळात बँक व्यवसायात खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली तंत्रज्ञान आधुनिकीकरण, वसुली व्यवस्थापन, एनपीए घट व ग्राहकाभिमुख सेवा यामध्ये उल्लेखनीय कामगिरी झाली होती.
त्यापूर्वी त्यांनी विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था या महत्त्वाच्या पदावर काम केले आहे. सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण, पतपुरवठा धोरण, कोअर बँकिंग अंमलबजावणी व ग्रामीण पतपुरवठा या विषयातील त्यांचे ज्ञान व अनुभव दांडगा आहे.
सिंधुदुर्ग बँकेच्या “सुवर्ण मनीष पर्वा”त महत्त्वाची जबाबदारी :
अध्यक्ष मनीष प्रकाश दळवी यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने गेल्या साडेचार वर्षांत ४ हजार ४५७ कोटींवरून ७५३१ कोटी व्यवसाय व १६ कोटींवरून ५० कोटी निव्वळ नफा अशी ऐतिहासिक झेप घेतली आहे. बँकेला सलग ‘अ’ ऑडिट वर्ग व राष्ट्रीय स्तरावरील ६ पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
या प्रगतीच्या टप्प्यावर अनिरुद्ध देसाई यांच्या रूपाने बँकेला अनुभवी प्रशासकीय नेतृत्व लाभले आहे. डिजिटल बँकिंग, १०० टक्के वसुलीचे ध्येय, शेतकरी-केंद्रित पतधोरण व सहकारी संस्थांचे बळकटीकरण या आघाड्यांवर त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
अध्यक्ष मनीष दळवी यांची प्रतिक्रिया :
“अनिरुद्ध देसाई यांच्यासारखा अनुभवी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून लाभणे ही बँकेसाठी जमेची बाजू आहे. पुणे जिल्हा बँकेतील त्यांची कामगिरी आम्ही पाहिली आहे. सिंधुदुर्गच्या सहकाराला आधुनिकतेची जोड देत राज्यात अव्वल बनवण्याच्या आमच्या ध्येयाला त्यांच्या अनुभवाची निश्चितच मदत होईल. रिझर्व बँकेने नियुक्तीस मान्यता दिल्याबद्दल आम्ही आभारी आहोत.”
नवनियुक्त सीईओ अनिरुद्ध देसाई यांचे मनोगत
“सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची आजची वाटचाल प्रेरणादायी आहे. अध्यक्ष मनीष दळवी, संचालक मंडळ व सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने बँकेला तंत्रज्ञान, पारदर्शकता व शेतकरी हिताच्या त्रिसूत्रीवर आणखी पुढे नेण्याचा माझा प्रयत्न राहील. १०० टक्के वसुली, एनपीए शून्यावर आणणे व प्रत्येक सभासदापर्यंत डिजिटल बँकिंग पोहोचवणे ही माझी प्राधान्ये असतील.”
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या पुढील वाटचालीत अनिरुद्ध देसाई यांच्या प्रशासकीय अनुभवाचा व अध्यक्ष मनीष दळवी यांच्या दूरदृष्टीचा समन्वय निश्चितच ‘सहकारातून समृद्धीकडे’ नेणारा ठरेल. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर अनुभवी व कार्यक्षम अधिकारी अनिरुद्ध देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीस रिझर्व बँकेने दि. ३ ऑगस्ट २०२६ रोजीच्या आदेशान्वये अधिकृत मान्यता दिली आहे. अनिरुद्ध देसाई हे सिंधुदुर्ग बँकेकडील मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून गेल्यानंतर हे पद रिक्त होते व प्रभारी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर पुनश्च त्यांची निवड करण्यात येत आहे.
अनिरुद्ध देसाई यांचा प्रशासकीय व सहकारातील प्रवास :
अनिरुद्ध देसाई हे सहकार व बँकिंग क्षेत्रातील २५ पेक्षा अधिक वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले अधिकारी आहेत. त्यांनी आजपर्यंत भूषवलेली महत्त्वाची पदे
१. मुख्य कार्यकारी अधिकारी
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.
कार्यकाळ : २००४ ते २००८
२०१० ते २०२२
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि,
कार्यकाळ : २०२२ ते २०२७
ठळक कामगिरी: कोअर बँकिंग १०० टक्के अंमलबजावणी, नेट एनपीए ० टक्के डिजिटल बँकिंगमध्ये राज्यात प्रथम क्रमांक, १२०० पेक्षा जास्त बचतगटांना कर्जपुरवठा, सहकारी संस्थांचे संगणकीकरण, अवसायानातील संस्थांचे यशस्वी पुनरुज्जीवन.
ठळक कामगिरी : कोकणासाठी विशेष एसएचजी -बँक लिंकेज, कृषी पतपुरवठा वाढ राज्यातील इतर जिल्हा मध्यवर्ती बँकांना नेहमीच मार्गदर्शन त्रिस्तरीय बँकिंग रचणे संदर्भात केंद्र, राज्य सरकारने नियुक्ती केलेल्या विविध समित्या वर सदस्य म्हणून कामकाज.