दोडामार्ग : भारत सरकारच्या नशा मुक्त अभियान अंतर्गत दोडामार्ग तालुक्यातील माध्यमिक विद्यालय येथे अभियान

शेअर करा

दोडामार्ग, दि. २५ आॅगस्ट

भारत सरकारच्या “नशा मुक्त भारत अभियान” अंतर्गत शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी संचलित दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, दोडामार्ग येथे इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत नशा मुक्त भारताची प्रतिज्ञा केली.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांना नशेचे दुष्परिणाम, तंबाखू, गुटखा, मद्य व इतर व्यसनांमुळे होणारे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आर्थिक नुकसान याबाबत मार्गदर्शन करून करण्यात आली. विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवनशैलीचे महत्त्व, निरोगी सवयींचा स्वीकार आणि समाजात जनजागृती करण्याची आवश्यकता पटवून देण्यात आली.


यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे “मी कोणत्याही प्रकारचे व्यसन करणार नाही, इतरांनाही व्यसनापासून दूर राहण्यास प्रेरित करीन आणि नशामुक्त भारत घडविण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहीन,” अशी प्रतिज्ञा घेतली. विद्यार्थ्यांनी उत्साहाने प्रतिज्ञेत सहभाग नोंदवत समाजात व्यसनमुक्तीचा संदेश देण्याचा निर्धार व्यक्त केला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांविषयी जागरूकता निर्माण झाली असून निरोगी, सुदृढ आणि जबाबदार नागरिक घडविण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. शाळेने अशा समाजोपयोगी उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार, सामाजिक उत्तरदायित्व आणि राष्ट्रप्रेमाची भावना जोपासण्याचा संकल्प पुन्हा अधोरेखित केला.
“नशामुक्त भारत – निरोगी भारत” हा संदेश विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून समाजापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.यावेळी स्वाती बहनजी अणि मीनाक्षी,अनघा बहनजी उपस्थित होत्या

शेअर करा