दोडामार्ग : ड्रग्स फ्री सिंधुदुर्गसाठी प्रहरी क्लबच्या विद्यार्थ्यांनी सज्ज व्हावे

शेअर करा

दोडामार्ग येथे प्रहरी क्लब प्रशिक्षण; व्यसनमुक्तीचा सामूहिक संकल्प

दोडामार्ग,दि.११ ऑगस्ट

सिंधुदुर्ग जिल्हा ड्रग्स फ्री करण्यासाठी प्रहरी क्लबच्या विद्यार्थ्यांनी सज्ज होऊन व्यसनांच्या विरोधात जनजागृतीची चळवळ उभारावी, असे आवाहन नशाबंदी मंडळ सिंधुदुर्गच्या जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांनी केले.

नशाबंदी मंडळ सिंधुदुर्ग, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग, समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग आणि व्यसनमुक्ती सल्ला केंद्र, गोपुरी आश्रम वागदे, ता. कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्त भारत अभियानांतर्गत दोडामार्ग तालुक्यातील हायस्कूलमधील प्रहरी क्लबच्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी मुंबरकर बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बालकांचा आणि विद्यार्थ्यांचा सहभाग अत्यंत प्रेरणादायी होता. त्याच धर्तीवर आजच्या काळात प्रहरी क्लबचे विद्यार्थी आपल्या देशाला व्यसनांपासून स्वातंत्र्य मिळवून देतील, असा विश्वास आहे. प्रहरी क्लबमधील विद्यार्थ्यांनी नशेच्या विरोधात लढा उभारून आपल्या शाळेसह गावाचा परिसर व्यसनमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा.

प्रहरी क्लब म्हणजे पहारा देणारा आणि सतर्क राहणारा समूह होय. व्यसनाधीन पदार्थांपासून स्वतः सतर्क राहणे आणि इतरांनाही सतर्क करणे, या उद्देशाने प्रहरी क्लबची स्थापना व जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक हायस्कूलमधील प्रहरी क्लबने या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

प्रहरी क्लबच्या माध्यमातून शाळा व गावाचा परिसर नशामुक्त ठेवण्यासाठी विविध जनजागृती उपक्रमांचे नियोजन करावे. प्रत्येक प्रहरी क्लबचा व्यसनविरोधी जनजागृतीचा कार्यकाल जून ते फेब्रुवारी असा राहणार असून, या कालावधीत उत्कृष्ट जनजागृतीचे कार्य करणाऱ्या प्रहरी क्लबला पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे मुंबरकर यांनी सांगितले.

या प्रशिक्षणासाठी हळवे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत, प्रा. प्रज्ञाकुमार गाथाडे, प्रा. जाधव, माध्यमिक विद्यालय मांगेलीचे मुख्याध्यापक पुंडलिक पाटील, कीर्ती विद्यालय घोडगेवाडीचे मुख्याध्यापक सखाराम कांबळे, शिक्षिका चेतना पटकारे, शिक्षक प्रवीण केसरकर, महेंद्र खांडेकर आणि राजाराम फर्जंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. प्रज्ञाकुमार गाथाडे यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानातील कलम ४७ चे वाचन करून करण्यात आली. कार्यक्रमाचा समारोप विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा सामूहिक संकल्प घेऊन केला.

शेअर करा