दोडामार्ग : उसपमधील निराधार माऊलीला गावकऱ्यांचा आधार लोकवर्गणीतून घराला नवे छप्पर

शेअर करा


माणूसकिचा धर्म आजही

दोडामार्ग, दि. ५ जून
गावात एखादी व्यक्ती संकटात अडचणीत असेल तर अशा वेळी तिच्या मदतीला धावून जाणे ही परंपरा आजही ग्रामीण भागात बघायला मिळते, उसप बोकारवाडी येथील निराधार महिला सुलोचना गवस हिचे घर मोडकळीस आले होते पावसाळ्यात कोसळणार होते ही बाब लक्षात येतात गावातील ग्रामस्थ युवक यांनी लोकवर्गणीतून या महिलेच्या घराला नवे छप्पर घालून दिले.

दोडामार्ग तालुक्यातील उसप बोकारवाडी येथील निराधार महिला सुलोचना दत्ताराम गवस यांचे घर पावसामुळे मोडकळीस आले होते. घराला छप्परच नसल्याने माऊली उघड्यावर आली होती व त्या शासनाच्या कोणत्याही योजनेस पात्र नव्हत्या.यामुळे मोठी समस्या निर्माण झाली होती. या घटनेची दखल घेत उपसरपंच दाजी नाईक, प्रकाश स. गवस, प्रवीण गवस आणि उत्तम दशरथ गवस, सिद्धेश गवस आणि बोकारवाडी मित्रमंडळ यांनी पुढाकार घेतला. त्यांनी समाजमाध्यमातून मदतीचे आवाहन केले असता अनेक दानशूर ग्रामस्थ व हितचिंतकांनी आर्थिक मदत जमा केली.

जमा झालेल्या वर्गणीतून घरावर नवीन पत्र्याचे छप्पर घालण्यात आले. त्यामुळे सुलोचना गवस यांना पावसाळ्यात निवाऱ्याचा आधार मिळाला असून, त्यांनी सर्व मदतकर्त्यांचे आभार मानले आहेत.

“माणुसकी हाच खरा धर्म” या भावनेतून गावकऱ्यांनी दाखवलेल्या एकीमुळे एका निराधार माऊलीचा संसार वाचला. उपसरपंच दाजी नाईक व सहकाऱ्यांनी घेतलेल्या या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शेअर करा