दोडामार्ग, दि. ७ जून
दोडामार्ग ते बेळगाव मार्गावर चंदगड तालुक्यातील पाटणे येथे मोटार सायकल तसेच मालवाहू टेम्पो दरम्यान झालेल्या अपघातात गोवा येथे कामाला असलेला माणगाव चंदगड येथील तरूण मिलिंद मारूती चिखलकर वय वर्षे ३० याचा दुदैवी मृत्यू झाला. या अपघात प्रकरणी चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

माणगाव चंदगड येथील युवक मिलिंद मारुती चिखलकर हा गोवा येथे एका फार्मा कंपनीत कामाला होता. तो आपल्या पुतण्याचा बारसा कार्यक्रम यासाठी आला होता.शनिवारी तो पुन्हा गोवा येथे मोटार सायकल वरून जात असताना पाटणे येथे मालवाहतूक टेम्पो दरम्यान अपघात झाला यात मिलिंद मारूती चिखलकर हा युवक ठार झाला त्याच्या अपघाती निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या पश्चात आई वडील, भाऊ, पत्नी, भावजय पुतण्या असा परिवार आहे. मिलिंद मारूती चिखलकर याच्या निधनामुळे कुटुंब हादरुन गेले आहे. या अपघात प्रकरणी चंदगड पोलीस अधिक तपास करत आहेत. मोटार सायकल मोठे नुकसान होऊन इंजिन देखील फुटले आहे. घटनास्थळी चंदगड पोलिसांनी पाहणी केली.