पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशाने देवगड-जामसंडेत फॉगिंगला सुरुवात

शेअर करा

डासांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपंचायतीची तत्काळ कार्यवाही; स्वच्छता सभापती निवृत्ती उर्फ बुवा तारी यांच्या पाठपुराव्याला यश

देवगड,दि.३१ ऑगस्ट

देवगड-जामसंडे नगरपंचायत हद्दीत गेल्या काही दिवसांपासून डासांचा प्रादुर्भाव वाढल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत होत्या. या तक्रारींची नगरसेवक तथा स्वच्छता सभापती निवृत्ती उर्फ बुवा तारी यांनी तत्काळ दखल घेतली. याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यात आल्यानंतर त्यांच्या आदेशानुसार नगरपंचायतीसाठी फॉगिंग मशीन तात्काळ उपलब्ध करून देण्यात आली असून, शहरातील विविध प्रभागांमध्ये फॉगिंगद्वारे धूर फवारणी सुरू करण्यात आली आहे.

गणेश चतुर्थीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला असून, या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे तसेच अन्य शहरांमध्ये नोकरी-व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले मोठ्या संख्येने चाकरमानी देवगड-जामसंडे शहरात दाखल होणार आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य आणि शहरातील स्वच्छतेच्या दृष्टीने डासांचा वाढता प्रादुर्भाव रोखणे गरजेचे होते.

नागरिकांनी डासांचा त्रास वाढल्याच्या तक्रारी केल्यानंतर स्वच्छता सभापती निवृत्ती उर्फ बुवा तारी यांनी या समस्येची गांभीर्याने दखल घेत तातडीने उपाययोजना सुरू केल्या. पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानुसार फॉगिंग मशीन उपलब्ध झाल्यानंतर नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरातील विविध प्रभागांमध्ये धूर फवारणी करण्यात येत आहे.

डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी तसेच नागरिकांची वर्दळ असलेल्या परिसरात फॉगिंग करण्यात येत असून, डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने चाकरमानी आणि नागरिक शहरात दाखल होणार असल्याने त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी स्वच्छता विभागाकडून ही मोहीम राबविण्यात येत आहे.

पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानुसार फॉगिंग मशीन तात्काळ उपलब्ध करून देण्यात आल्याने आणि नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत धूर फवारणी सुरू झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. आगामी काळातही शहरातील स्वच्छता व आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना सातत्याने राबविण्यात याव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

शेअर करा