फोंडाघाट महाविद्यालय एनसीसी विभागाचा उपक्रम
फोंडाघाट,दि.२८ सप्टेंबर (संजय सावंत)
कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाटच्या एनसीसी विभागाच्या वतीने जागतिक नदी दिवस फोंडाघाट येथील उगवाई नदी परिसरात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने एनसीसी कॅडेट्सनी नदीच्या आजूबाजूचा परिसर तसेच उगवाई नदीपात्राची स्वच्छता करून नदी संवर्धनाचा संदेश दिला.
या स्वच्छता अभियानात एनसीसी कॅडेट्सनी नदीपात्रातील प्लास्टिक व इतर कचरा गोळा केला. सुमारे ३० किलो प्लास्टिक कचरा संकलित करण्यात आला. संकलित केलेला सर्व कचरा फोंडाघाट ग्रामपंचायत कार्यालयाच्या घंटागाडीकडे स्वाधीन करण्यात आला.
यावेळी महाविद्यालयाचे एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट डॉ. राज ताडेराव यांनी कॅडेट्सना मार्गदर्शन केले. नदी ही केवळ पाण्याचा स्रोत नसून मानवी जीवन, पर्यावरण आणि जैवविविधतेचा महत्त्वपूर्ण आधार आहे. त्यामुळे नदीपात्रात कचरा टाकू नये, नदी व जलस्रोतांच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे तसेच प्रत्येक NCC कॅडेटने सामाजिक कार्यात हिरिरीने सहभाग घेतला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे तसेच फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी व सर्व संचालक यांनी एनसीसी विभाग आणि कॅडेट्सचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
या अभियानास फोंडाघाट ग्रामपंचायत कार्यालयाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी सीनियर अंडर ऑफिसर नीता धुरी हिने उपस्थितांचे आभार मानले.
NCC कॅडेट्सनी राबविलेल्या या उपक्रमातून ‘स्वच्छ नदी, निरोगी पर्यावरण आणि सुरक्षित भविष्य’ असा प्रभावी संदेश देण्यात आला.