फोंडाघाट ८ सप्टेंबर
कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथे आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्या वतीने प्रथम सत्र प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच त्यांच्यामध्ये सामाजिक बांधिलकी, व्यक्तिमत्त्व विकास, कौशल्यविकास आणि समाजाभिमुख दृष्टिकोन निर्माण करण्याच्या उद्देशाने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे विभागप्रमुख डॉ. संतोष रायबोले यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षणासोबतच विविध सामाजिक, शैक्षणिक व विस्तार उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन समाजाशी आपले नाते अधिक दृढ करावे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी क्षेत्र समन्वयक प्रा. सुरेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणाच्या माध्यमातून मिळणाऱ्या ज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनात उपयोग करावा. शिक्षण हे केवळ पदवी मिळविण्यापुरते मर्यादित नसून व्यक्तिमत्त्व विकास आणि समाजाच्या प्रगतीसाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी शिस्त, जबाबदारी, सामाजिक जाणीव आणि सकारात्मक दृष्टिकोन अंगीकारण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून आनंदीबाई रावराणे महाविद्यालय, वैभववाडीचे प्राचार्य डॉ. के. आर. चव्हाण उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांनी नवीन ज्ञान, कौशल्ये आणि अनुभव आत्मसात करणे आवश्यक असल्याचे सांगितले. आजीवन अध्ययनाची संकल्पना विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान देत नाही, तर त्यांना जीवनातील विविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सक्षम बनवते, असे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीव ठेवून समाजाच्या विकासामध्ये आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांनी भूषविले. अध्यक्षीय मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अशा प्रशिक्षण कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातून मिळणाऱ्या ज्ञानाबरोबरच सामाजिक मूल्ये, नेतृत्वगुण, संवादकौशल्य आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव विकसित करावी, असे त्यांनी सांगितले. आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. रुपाली पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.