फोंडाघाट,दि.०८ सप्टेंबर
कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथील अर्थशास्त्र विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या आर्थिक विषयांबाबतच्या ज्ञानात भर पडावी तसेच भारतीय अर्थव्यवस्थेतील सद्यस्थिती आणि आव्हानांची विद्यार्थ्यांना जाणीव व्हावी, या उद्देशाने ‘भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य तथा वैभववाडी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. आर. चव्हाण उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. चव्हाण यांनी भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील विविध आव्हानांचा सविस्तर आढावा घेतला. भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल, आर्थिक विकासासमोरील अडथळे, महागाई, गरिबी, उत्पन्नातील विषमता, बेकारी, लोकसंख्यावाढ, कौशल्याचा अभाव तसेच ग्रामीण व शहरी अर्थव्यवस्थेतील समस्या याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विशेषतः बेकारीची समस्या आणि रोजगारनिर्मितीची गरज यावर त्यांनी प्रकाश टाकला. पारंपरिक रोजगाराच्या संधींबरोबरच बदलत्या अर्थव्यवस्थेत कौशल्याधारित रोजगार, स्वयंरोजगार आणि उद्योजकतेला असलेले महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी बदलत्या रोजगार बाजारपेठेच्या गरजा ओळखून आवश्यक कौशल्ये आत्मसात करावीत, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी कोकणातील रोजगाराच्या संधी आणि पर्यटन क्षेत्राची क्षमता यावरही डॉ. चव्हाण यांनी विशेष भाष्य केले. कोकणचा निसर्ग, समुद्रकिनारे, ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा, जैवविविधता आणि स्थानिक खाद्यसंस्कृती यांचा प्रभावी वापर करून पर्यटन क्षेत्राचा विकास करता येऊ शकतो. पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. स्थानिक युवकांनी पर्यटनाशी संबंधित सेवा, होमस्टे, स्थानिक उत्पादने, मार्गदर्शक सेवा, वाहतूक, खाद्यव्यवसाय आणि इतर पूरक व्यवसायांकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भारतीय अर्थव्यवस्थेतील बदल समजून घेणे हे केवळ अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठीच नव्हे, तर प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आवश्यक आहे. देशाच्या आर्थिक विकासामध्ये युवकांची भूमिका महत्त्वपूर्ण असून विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच कौशल्यविकास, उद्योजकता आणि रोजगाराच्या नव्या संधींचा शोध घेण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. कोकणातील उपलब्ध नैसर्गिक व मानवी संसाधनांचा योग्य वापर केल्यास या प्रदेशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळू शकते, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. बालाजी सुरवसे यांनी केले. त्यांनी व्याख्यानाच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट करताना भारतीय अर्थव्यवस्थेतील बदलत्या परिस्थितीचा विद्यार्थ्यांनी चिकित्सकपणे अभ्यास करणे आवश्यक असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे आभार डॉ. राजाराम पाटील यांनी मानले.
या कार्यक्रमाला वैभववाडी महाविद्यालयाचे डॉ. सुरेश पाटील, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
