फोंडाघाट महाविद्यालयाच्या बी.ए. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची बँक ऑफ महाराष्ट्रला शैक्षणिक भेट
फोंडाघाट,दि. १९ ऑगस्ट (संजय सावंत)
फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी संचलित कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाटच्या बी.ए. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र, फोंडाघाट शाखेला शैक्षणिक भेट दिली. विद्यार्थ्यांना बँकेचे प्रत्यक्ष कामकाज, विविध बँकिंग सेवा, बचत योजना तसेच कर्ज योजनांची माहिती व्हावी, हा या भेटीचा प्रमुख उद्देश होता.
यावेळी बँक ऑफ महाराष्ट्र, फोंडाघाट शाखेचे शाखाधिकारी रवीकुमार लोहकरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी लहान वयापासूनच बचतीची सवय लावून नियमित बँकिंग व्यवहार करावेत, असे आवाहन त्यांनी केले. बचत खाते सुरू करण्याची प्रक्रिया, बँकेतील विविध ठेवींचे प्रकार, विद्यार्थ्यांसाठीची महा सरस्वती ठेव योजना तसेच ज्येष्ठ नागरिक ठेव योजना याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.
तसेच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृहकर्ज, व्यावसायिक कर्ज, पीक कर्ज, सोनेतारण कर्ज आणि किसान क्रेडिट कार्ड यांसारख्या विविध कर्ज योजनांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. “कोणत्याही विद्यार्थ्याने आर्थिक अडचणीमुळे आपले शिक्षण थांबवू नये,” असे सांगून विद्यार्थ्यांनी उपलब्ध शैक्षणिक कर्ज सुविधांचा योग्य प्रकारे लाभ घ्यावा, असे लोहकरे यांनी स्पष्ट केले.
नवीन उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा. आपल्या आवडीनुसार आणि कौशल्यानुसार उद्योग उभारून स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. बालाजी सुरवसे यांनी विद्यार्थ्यांनी अशा शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव घेत आपल्या ज्ञानाचा व व्यक्तिमत्त्वाचा विकास साधावा, असे सांगितले. या शैक्षणिक भेटीस सहकार्य करणाऱ्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या व्यवस्थापनाचे तसेच सर्व उपस्थितांचे त्यांनी आभार मानले.
या शैक्षणिक भेटीस फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांचे मार्गदर्शन लाभले. या भेटीमुळे विद्यार्थ्यांना बँकेच्या प्रत्यक्ष कार्यपद्धतीची तसेच विविध आर्थिक व बँकिंग सेवांची उपयुक्त माहिती मिळाली.