🔴फोंडाघाट पंचक्रोशीतील गणपतीना अनंत चतुर्दशीला भावपूर्ण निरोप
🔴पद्मश्री डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, फोंडाघाट श्री सदस्यांचा निर्माल्या पासून खतनिर्मिती करिता निर्माल्य संकलनचा स्तुत्य उपक्रम पंचक्रोशीतील २५ विसर्जन घाटावर राबविण्यात आला.
फोंडाघाट,दि.२६ सप्टेंबर (संजय सावंत)
“निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी, चुकले आमचे काही देवा क्षमा असावी” अशी गणपती बाप्पा समोर करुणा भाकत फोंडाघाट सह लोरे, वाघेरी, घोणसरी,गडगेसखल, पावणादेवी भागातील गणेशोत्सवाच्या मंगलमय दिवसांची सांगता अनंत चतुर्दशीला भावपूर्ण वातावरणात झाली. ढोल-ताशांचा गजर, टाळ-मृदंगाचा निनाद आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात गणरायाला निरोप देण्यात आला. बाप्पाला निरोप देताना भक्तांच्या डोळ्यांत अश्रू होते. मात्र मनात पुढील वर्षीच्या आगमनाची आस होती.

या वर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. नद्या, ओहोळ आणि जलस्रोतांमध्ये अपेक्षित पाणी नसल्याने शेतीसह सर्वसामान्यांच्या जीवनावर त्याचा परिणाम जाणवत आहे. त्यामुळे विसर्जनावेळी गणेशभक्तांनी चांगला आणि भरपूर पाऊस पडू दे, निसर्ग पुन्हा हिरवागार होऊ दे, अशी मनोभावे प्रार्थना बाप्पाच्या चरणी केली.
फोंडाघाट पंचक्रोशी परिसरातील विविध ठिकाणी गणरायाच्या मिरवणुका उत्साहात काढण्यात आल्या. पारंपरिक वाद्यांचा निनाद, भक्तिगीते आणि ‘बाप्पा मोरया’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. विसर्जनापूर्वी आरती करून गणरायाला निरोप देताना अनेक भक्त भावुक झाले.

‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या, आनंदाने या, उत्साह घेऊन या आणि भरभरून पाऊस घेऊन या!’ या भावनिक जयघोषात गणरायांचे विसर्जन करण्यात आले.बाप्पाची मूर्ती जलात विसर्जित झाली, मात्र भक्तांच्या मनातील श्रद्धा आणि पुढील वर्षीच्या आगमनाची ओढ कायम राहिली. यंदाच्या पावसाच्या कमतरतेची खंत मनात ठेवत, पुढील वर्षी सुख-समृद्धीसोबत भरपूर पाऊस घेऊन येण्याचे साकडे गणरायाला घालत भक्तांनी भावपूर्ण निरोप दिला.
🔴(निर्माल्यापासून खत निर्मितीचा उपक्रमासाठी पद्मश्री डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान अलिबाग रेवदंडा यांच्या फोंडाघाट श्री सदस्यांन मार्फत फोंडाघाट पंचक्रोशीतील सुमारे २५ गणेश विसर्जन घाटावर निर्माल्य संकलन केंद्र उभारण्यात आली होती. या निर्माल्य संकलनातून वृक्षांसाठी खत निर्मिती केली जाणार असून धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या फोंडाघाट येथील श्री सदस्यांनी दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस, अकरा दिवस बारा दिवसाच्या गणेश विसर्जनांचे जवळ जवळ १००० किलो पेक्षा जास्त निर्माल्य गोळा करून निस्वार्थ भावनेने ही सेवा बजावली आहे त्याचबरोबर निर्माल्य नदी जावून पाणी दूषित होण्यापासून वाचवले आहे.सर्व निर्माल्य संकलित करून त्यापासून सेंद्रिय खत निर्मिती केली जाणार असून ते खत झाडांसाठी वापरले जाणार आहे निर्माल्याचा पूर्णपणे योग्य विल्हेवाट लावून त्यांचा पर्यावरण पूरक वापर करण्याचा हा उपक्रम पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात असून या उपक्रमाबाबत सर्व श्री सदस्यांचे व नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे फोंडाघाट पंचक्रोशीतील सर्व गणेश भक्तांनी व नागरिकांनी मनःपूर्वक आभार मानले)