जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते श्री कुणकेश्वराची प्रथम पूजा; ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमला
देवगड,दि.१७ ऑगस्ट
कोकणची काशी म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरात श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी भक्तिमय वातावरणात श्री कुणकेश्वराची प्रथम पूजा संपन्न झाली. जिल्हाधिकारी सौ. तृप्ती धोंडमिसे, सहाय्यक धर्मादाय आयुक्त सौ. अवंतिका कुलकर्णी तसेच प्रसिद्ध उद्योजक श्री. संजय लक्ष्मण गावडे यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली.

श्रावण सोमवारनिमित्त पहाटेपासूनच कुणकेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. ‘हर हर महादेव, कुणकेश्वर महाराज की जय’ अशा जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय झाला होता. दूरवरून आलेल्या भाविकांनी रांगेत उभे राहून स्वयंभू श्री देव कुणकेश्वराचे दर्शन घेतले.

श्रावणी सोमवार उत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी विविध व्यवस्था करण्यात आल्या आहेत. सुलभ दर्शनासाठी मंडप उभारून दर्शनरांगेचे नियोजन करण्यात आले असून, भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस बंदोबस्त, वाहतूक नियंत्रण आणि पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली असून, प्रत्येक श्रावणी सोमवारी मंदिरात विविध भजन मंडळांचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

पूजेनंतर उपस्थित मान्यवरांचा श्री कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष गणेश वाळके, सचिव हेमंत वातकर, खजिनदार उदय पेडणेकर, व्यवस्थापक रामदास तेजम, महेश जोईल, संजय वाळके, मंगेश पेडणेकर, दीपक घाडी यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
श्रावण महिन्यातील पुढील सोमवारीही भाविकांनी मोठ्या संख्येने कुणकेश्वर येथे उपस्थित राहून स्वयंभू श्री देव कुणकेश्वराचे दर्शन घ्यावे, असे आवाहन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री. एकनाथ तेली यांनी केले आहे.