वैभववाडी,दि.२७ सप्टेंबर
गावागावांतील शाळा टिकल्या पाहिजेत, विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काचे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे आणि प्रत्येक वर्गाला आवश्यक शिक्षक उपलब्ध झाले पाहिजेत, या मागणीसाठी वैभववाडी तालुका आता आक्रमकपणे मैदानात उतरणार आहे. ‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा’ या घोषणेने ५ ऑक्टोबरला मुंबईतील आझाद मैदान दुमदुमणार असून, या बेमुदत धरणे आंदोलनात वैभववाडी तालुक्यातून २०० ते ३०० ग्रामस्थ सहभागी होणार आहेत.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तालुकास्तरीय नियोजन बैठक डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व संस्कृतीक भवन, वैभववाडी येथे वैभववाडी तालूका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी आंदोलनाच्या नियोजनासह गावागावांत जनजागृती करून अधिकाधिक ग्रामस्थांचा सहभाग वाढविण्याबाबत चर्चा करण्यात आली.
२०२४ ची संचमान्यता शासन निर्णय मागे घ्यावा, गाव, वाडी आणि वस्ती तिथे शाळा असलीच पाहिजे, प्रत्येक वर्गासाठी तसेच प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र शिक्षक उपलब्ध करून द्यावा, यासह विविध शैक्षणिक मागण्या आंदोलनातून शासनासमोर मांडण्यात येणार आहेत.
शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंच महाराष्ट्र विभाग सिंधुदुर्गचे निमंत्रक संजय वेतुरेकर यांनी बैठकीत मार्गदर्शन करताना आंदोलनाची दिशा आणि नियोजन स्पष्ट केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी स्थानिक पातळीवरील शाळा टिकणे आणि आवश्यक शिक्षक उपलब्ध होणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीस तालुक्यातील शाळा व्यवस्थापन समित्यांचे अध्यक्ष, शिक्षक-पालक संघाचे पदाधिकारी, ग्रामस्थ, संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी तसेच शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी तालुक्यातील विविध गावांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, मुंबईतील आंदोलनात जास्तीत जास्त ग्रामस्थ सहभागी व्हावेत, असे आवाहन करण्यात आले.