देवगडमध्ये २९ सप्टेंबरला रोजगार मेळावाशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व स. ह. केळकर महाविद्यालयाचा संयुक्त उपक्रम

शेअर करा

देवगड दि.२४ सप्टेंबर

देशातील युवकांना रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्य विकास आणि उद्योजकतेच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ २०२६ – महाराष्ट्र’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत राज्यभर एकाच दिवशी सुमारे १०० रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्यात येणार असून, त्याचा एक भाग म्हणून देवगड येथेही रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता देवगड येथील स. ह. केळकर महाविद्यालयात हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), देवगड आणि स. ह. केळकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या माध्यमातून युवकांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांना कौशल्य विकास आणि उद्योग क्षेत्राशी जोडण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात येणार आहे. विविध आस्थापना व कंपन्यांमध्ये उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधींबाबत उमेदवारांना माहिती मिळणार असून, पात्र उमेदवारांसाठी निवड प्रक्रिया व प्लेसमेंटची संधी उपलब्ध होणार आहे.
या राज्यव्यापी रोजगार महाकुंभाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. त्यानंतर राज्यातील विविध ठिकाणी आयोजित रोजगार मेळाव्यांना सुरुवात होणार आहे.
देवगड तालुक्यातील तसेच परिसरातील नोकरीच्या शोधात असलेले युवक-युवती, आयटीआय व विविध शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी, कौशल्यप्राप्त उमेदवार आणि रोजगाराच्या संधी शोधणाऱ्या इच्छुकांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देवगड यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील युवकांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरणार असून, युवकांनी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे व प्रमाणपत्रांसह उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर करा